जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये (पंचायत समित्यांसह) उत्कृष्ट काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला शासनातर्फे गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मानित केले जाते. २०२१-२२ या वर्षातील गुणवंत कर्मचारी निवडण्याची कार्यवाही सध्या सुरू असून आतापर्यंत चौघांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे प्राप्त झाले आहेत.
जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत, शिक्षण, वित्त व लेखा, सामान्य प्रशासन, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, आरोग्य, बांधकाम अशा विविध विभागांमध्ये अंदाजे दीडशेहून अधिक कर्मचारी आहेत. तालुका पंचायत समित्यांमध्येही चारशेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
शासनाच्या आदेशानुसार ज्या कर्मचाऱ्याने दैनंदिन कामाशिवाय सामाजिक बांधिलकीतून किंवा इतरही कौतुकास्पद कामे केली आहेत, त्याचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. पण, त्यासाठी त्या कर्मचाऱ्यानेच स्वत:हून प्रस्ताव देणे अपेक्षित आहे.