दोन महिन्यांपासून इच्छेविरुद्ध अश्लील मेसेज पाठवणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. पोलिसांनी ॲक्शन घेत त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. सर्फराज नाईकवाडी (आसरा परिसर, सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या तरुणाचे नाव आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पीडिता शहरातील एका परिसरात भाड्याने राहण्यास आहे. नमूद आरोपीकडून ७ फेब्रुवारी पासून २६ एप्रिल पर्यंत वारंवार त्याच्या मोबाइलवरुन पीडित महिलेच्या मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवून हैराण केले. या प्रकारामुळे फिर्यादीला मनस्ताप झाला. लोकलज्जेस्तव म्हणून दोन महिने मानसिक त्रास सहन केला. अखेर या प्रकाराला कंटाळून या प्रकाराचा शेवट करायचा म्हणून एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सपोनि चंदनशिव यांच्या कानावर ही बाब सांगितली. त्यांनी नमूद आरोपीच्या विरोधात भादंवि. ३५४ ड अन्वये गुन्हा नोंदला. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.