सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आगामी ‘महाराष्ट्र आंतर विद्यापीठ कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा’ आयोजित करण्याचा मान यंदा सोलापूर विद्यापीठाला मिळाला आहे. ही स्पर्धा ४ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार असल्याची माहिती विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. अतुल लकडे यांनी दिली.
सोलापूर विद्यापीठाला या राज्यस्तरीय स्पर्धेचे यजमानपद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील १६ ते २० विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत.
विद्यापीठांमधील कायमस्वरूपी अधिकारी आणि कर्मचारी या क्रिकेट स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावतील. ही स्पर्धा साखळी (League) आणि बाद (Knock-out) अशा दोन्ही पद्धतींनी खेळवण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची आणि संघांची निवासाची सोय केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात करण्यात आली आहे.
या मैदानांवर रंगणार सामने:
स्पर्धेचे नियोजन शहरांतील प्रमुख चार मैदानांवर करण्यात आले आहे:
१. इंदिरा गांधी पार्क स्टेडियम
२. रेल्वे मैदान
३. दयानंद महाविद्यालय मैदान
४. भंडारी मैदान, जुळे सोलापूर.
छत्रपती शिवाजी संकुलातील सूर्य मावळतीचा स्मृतींच्या वाटेवरचा मंगळवारचा निसर्ग सौंदर्याचा शांत क्षण आणि त्याचवेळी निरभ्र आकाशात मिणमिणती चंत्रकोर मनाला भावते.
























