सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर शहरातील प्रचार साहित्य बाजारात मोठी उलाढाल सुरू झाली आहे. अंतिम उमेदवार यादी स्पष्ट झाल्यानंतर मधला मारुती परिसरातील प्रचार साहित्य विक्री केंद्रांमध्ये एकाचवेळी ऑर्डरींचा ओघ वाढल्याने हा परिसर गजबजलेला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत सुमारे ५६४ उमेदवार रिंगणात असून, प्रत्यक्ष प्रचाराला आता वेग आला आहे. याचा थेट परिणाम प्रचार साहित्याच्या विक्रीवर झाला आहे. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या विविध पक्ष चिन्हाच्या साहित्याचीही विक्री होत आहे. तसेच इतर राजकीय पक्षांच्या चिन्हाच्या साहित्याला मागणी असल्याचे चित्र आहे.
शहरातील मधला मारुती येथील व्यापाऱ्यांनी सांगितले की, चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण होताच अचानक ऑर्डरी वाढल्या आहेत. टी-शर्ट, स्कार्फ, झेंडे यांना विशेष मागणी असून, भाजपचे साहित्य येताच तात्काळ संपत असल्याचे त्यांनी नमूद केले. यंदा प्रचार साहित्याची खरेदी उशिरा सुरू झाली असली, तरी सध्या मागणी झपाट्याने वाढत आहे.
टी-शर्ट, झेंडे, बिल्ले, दुपट्टे, पोस्टर व प्लेकार्डला मागणी
अंतिम उमेदवार निश्चित होताच टी-शर्ट, झेंडे, बिल्ले, दुपट्टे, पोस्टर व प्लेकार्ड यांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. पदयात्रा, प्रभागनिहाय प्रचार फेऱ्या व कॉर्नर सभा सुरू झाल्याने तातडीच्या ऑर्डरी मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत. कमी वेळेत जास्त साहित्य मिळावे यासाठी अनेक उमेदवार रात्री उशिरापर्यंत छपाई करून घेत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
डिजिटलसोबत पारंपरिक प्रचारालाही चालना
डिजिटल प्रचाराचे महत्त्व वाढले असले, तरी अंतिम टप्प्यात प्रत्यक्ष प्रचाराशिवाय निवडणूक जिंकणे कठीण असल्याची जाणीव उमेदवारांना होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोशल मीडियासोबतच झेंडे, बिल्ले, टी-शर्ट यांसारख्या पारंपरिक प्रचार साहित्यालाही पुन्हा जोर आला आहे. पुढील काही दिवसांत मधला मारुती परिसरातील प्रचार साहित्य बाजार पूर्ण क्षमतेने फुलणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
























