वेळापूर – श्री अर्धनारी नटेश्वर जेष्ठ नागरिक संघटना, वेळापूर यांच्या तर्फे इंग्लिश स्कूल, वेळापूर येथील क्रीडा शिक्षक सतीश कदम यांचा सन्मान करण्यात आला. सतीश कदम यांना सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने दिला जाणारा “आदर्श शिक्षक पुरस्कार” नुकताच प्राप्त झाला असून, त्यांच्या या यशाबद्दल संघटनेतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सचिव हणमंत मेलगे यांनी सांगितले की, सतीश कदम हे इंग्लिश स्कूल, वेळापूरच्या माध्यमातून खो-खो खेळ विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी आणि त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत अनेक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू बनले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे ते आदर्श शिक्षक ठरले असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष एकनाथ राऊत यांच्या हस्ते सतीश कदम यांचा शाल, हार व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
सन्मानानंतर आपल्या भावना व्यक्त करताना सतीश कदम म्हणाले की, “विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम आणि शिस्त निर्माण करणे हेच माझे ध्येय आहे. खो-खो या पारंपरिक खेळाद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही यश मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.”
सतीश कदम यांनी त्यांच्या शिक्षकसेवेत खो-खो खेळाडूंसाठी विविध उपक्रम राबवले असून, मुला-मुलींच्या नियमित सरावातून जिल्हा व राज्यस्तरावर खो खो मध्ये शाळेने दबदबा निर्माण केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेऊनच त्यांना “आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास संघटनेचे अध्यक्षा रतन काकुळे, उपाध्यक्ष एकनाथ राऊत, सचिव हणमंत मेलगे, तसेच राऊत सर, जोशी सर, आडत, कृपाळ गुरुजी, रसूल आतार (मामा), साळुंखे, पिसे, शिंदे, माने सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हणमंत मेलगे यांनी केले तर आभार प्रदर्शन एकनाथ राऊत यांनी केले.
















