सालाबादप्रमाणे यावर्षीही गणपती येत असून त्यासाठी कोकणातील गणेश भक्त लगबगीने तयारीला लागले आहेत. गौरी गणपती हा कोकणातील मुख्य उत्सव. या उत्सवासाठी चाकरमानी आवर्जून गावी येतात आणि मोठ्या उत्साहात गौरी गणपतीचा सण साजरा करतात. यावर्षीही चाकरमानी गौरी गणपतीसाठी गावी कोकणात येणार आहे. रेल्वेने त्यासाठी जादा गाड्या सोडल्या आहेत पण या गाड्यांचे आरक्षण विक्रमी वेळेत फुल्ल झाले.
एसटी महामंडळ देखील जादा गाड्या सोडणार आहेत. बोरिवली, भाईंदर, ठाणे, मुलुंड, भांडुप, कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी अशा ठिकाणाहून तब्बल दीड हजार बस सोडण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे याबद्दल महामंडळाचे आभारच मानावे लागेल. अर्थात यातून रेल्वे आणि एसटीला अतिरिक्त महसुल मिळणार हे वेगळे सांगायला नको मात्र यातून गावी जाणारा चाकरमानी गणेशभक्त समाधानी असेल का? हा प्रश्न पडतो कारण ज्या कोकणवासीयांसाठी रेल्वेने जादा गाड्या सोडल्या त्याच कोकणवासीयांना या गाड्यांचे आरक्षण मिळाले नाही. अवघ्या काही वेळात रेल्वेचे आरक्षण फुल्ल कसे होते हे एक न सुटलेले कोडे आहे. एसटीने इतक्या लांबचा प्रवास करुन कोकणात जायचे म्हणजे मोठे दिव्यच. इतक्या लांबचा खाच खळग्यांनी भरलेला प्रवास करून कोकणात जाणारा गौरी गणपतीसाठी जाणारे चाकरमानी गणेशभक्त समाधानी कसे राहतील याचा विचार प्रशासनाने करावा.