सोलापूर : आईवडिलांची सेवा देवपूजेपेक्षाही सर्वश्रेष्ठ असून शिक्षणामुळे प्रगतीची दारी खुली होतात. त्यामुळेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मदत मिळणे गरजेचे असते. आईवडिलांची सेवा करण्याबरोबरच निराधार विद्यार्थ्यांचे शिक्षण करणे या पार्श्वभूमीवर मातोश्री रुक्मिणी फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याचा विचार कौतुकास्पद असून हा विचार आणखीन प्रभाविपणे प्रसारित झाला तर समाजातील गरजूंना मदतीचा हात मिळणार आहे. गुणवंतांना शिष्यवृत्ती वाटपाचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
नामदेवराव भालशंकर यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नामदेवराव (बापू) बंडूजी भालशंकर गौरव समिती, मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन तसेच सम्यक अकॅडमी व लोकराजा फाउंडेशन यांच्यावतीने शिवस्मारक सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार आणि शिष्यवृत्ती तसेच संविधान गौरव परीक्षेतील गुणवंतांना पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अण्णासाहेब भालशंकर हे होते. यावेळी मंचकावर मातोश्री रुक्मिणी भालशंकर, प्रार्थना फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद मोहिते, शिक्षण विभाग वेतन व भ. नि.नि. पथकाचे जिल्हा अधीक्षक लक्ष्मण बालवाड, सागर अंबूरे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागाचे सदस्य प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ, समता सैनिक दलाच्या जिओसी सुमित्रा जाधव, नानासाहेब भांलशंकर, गौरव समितीचे सचिव प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
त्यानंतर भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन रवी देवकर यांनी करून घेतल्यानंतर दिवंगत रुक्मिणी गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर 12 पुरस्कारार्थींना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर मातोश्री रुक्मिणी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच निराधार गरजू , दत्तक विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वितरण केल्यानंतर सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित केलेल्या संविधान गौरव परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना भरघोस रकमेचे धनादेश, पारितोषिके व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना अण्णासाहेब भालशंकर म्हणाले, “आपण प्रत्येकाने जन्मदाते आई-वडिलांची काळजी घेणे, सेवा करणे ही आपली नैतिक जबाबदारी असून, प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना शिक्षण देणे तितकेच आवश्यक आहे. आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी मुलांचे शिक्षण थांबू नये; कारण शिक्षणामुळेच पुढची पिढी घडते व समाज प्रगत होतो”.
यावेळी प्रा. बापूसाहेब आडसूळ, सुमित्रा जाधव यांचेही मनोगत झाले. या समारंभाचे प्रास्ताविक रवी देवकर यांनी केले. सूत्रसंचालन विक्री करनिरीक्षक बुद्धजय भालशंकर व प्रा. युवराज भोसले यांनी केले तर शिवाजी जगताप यांनी आभार मानले. याप्रसंगी चिमुकल्यांनी नामदेवराव भालशंकर यांच्या पूर्व आयुष्यावर आधारित नातवांनी वास्तववादी लघुनाटिका सादर केली.
यांचा झाला पुरस्काराने सन्मान
तथागत भगवान गौतम बुध्द धम्मरत्न पुरस्कार आनंद जाधव (सरचिटणीस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती ॲन्टॉप हिल, मुंबई), डॉ. बाबासाहेब आंबेडकर समतारत्न पुरस्कार चंदाताई कासले (लेफ्टनंट जनरल- समता सैनिक दल, मुंबई), राजर्षी शाहू महाराज जीवनगौरव पुरस्कार दिलीपराव चौगुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्काराने डॉ. सुरेश कोरे , क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले समाजरत्न पुरस्कार युवराज पवार , राजर्षी शाहू महाराज उद्योगरत्न पुरस्कार शंकर चौगुले , क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार- लाडजी बागवान , राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार मयुर प्रधान, राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार मनोहर कुंभार , डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार – विश्वभूषण लिमये (उपसंपादक-साम टि. व्ही. मराठी), राहुल भालशंकर, ( संपादक तेजस न्यूज महाराष्ट्र), तथागत भगवान गौतम बुध्द विशेष गौरव पुरस्कार- सम्यक विचार मंच-मिलिंद व्याख्यानमाला, सोलापूर या सत्कारमुर्तीचा सपत्नीक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ, शाल, वृक्षाचे रोपटे देवून सत्कार करण्यात आला.

























