अक्कलकोट – शिक्षण, उद्योग, आरोग्य व शेती क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबतच तंत्रज्ञानावर आधारित कौशल्याधिष्ठित शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तरच भविष्यकाल उज्वल होईल असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित सौ सुरेखा कल्याणशेट्टी विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जूनियर विभाग प्रमुख पूनम कोकळगी, सेमी इंग्लिश विभाग प्रमुख रूपाली शहा, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, पर्यवेक्षक सुर्यकांत रुगे उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आयटीआय, पॉलिटेक्निक, डिप्लोमा अभ्यासक्रम आणि कौशल्य विकास प्रशिक्षण विद्यार्थ्यांना अल्पकालावधीत रोजगारक्षम बनवतात. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, फॅशन डिझाईन, हॉटेल मॅनेजमेंट, पर्यटन, आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये देखील चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
पुनम कोकळगी म्हणाल्या की, डिजिटल युगात तंत्रज्ञानामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, डिझाईन, डिजिटल मार्केटिंग अशा क्षेत्रांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संगणक कौशल्ये, तांत्रिक ज्ञान, आत्मसात करावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैष्णवी डोंमनाळे यांनी केले. सूत्रसंचलन सौंदर्या खांडेकर यांनी केले तर आभार वैष्णवी टपाले यांनी मानले यशस्वीतेसाठी कल्पना स्वामी, सागर मठदेवरू, मनीषा सुरवसे, रविकिरण दंतकाळे यांनी प्रयत्न केले.
विद्यार्थ्यांनीकडून ऋणनिर्देश
निरोप समारंभाच्या कार्यक्रमात अदिती बाणेगाव, मयुरी साळुंके, आरती सावळे, लक्ष्मी भुशेट्टी, विनिता बिराजदार, सृष्टी गवारे या विद्यार्थ्यांनी आपल्याला घडविले म्हणून आयुष्यभर शाळेचे ऋण आम्ही फेडू शकणार नाही असे आपल्या भाषणातून सांगितले.























