सोलापूर : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रात आवश्यक असलेले स्टेशनरी साहित्यासह इतर आवश्यक साहित्य वितरण करण्यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या दोन पिशव्यांमध्ये हे सर्व साहित्य पॅक करून वितरणासाठी नेटके नियोजन केले आहे.
सोलापूर महापालिका आवारातील इंद्रभूवन मागील जागेतील कक्षात निवडणुकीसाठी मतदान केंद्रात आवश्यक असलेले स्टेशनरी साहित्यासह इतर आवश्यक साहित्य पॅकिंग करण्याची लगबग पाहायला मिळाली. महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार या साहित्य वितरणासंदर्भात आवश्यक त्या दिल्या. उपअभियंता अविनाश वाघमारे सतीश बुर्ला, विशाल जकातदार, सिद्धाराम मेंदगुडले यांच्यासह सुमारे 25 कर्मचारी कार्यरत होते.
या कक्षात संबंधित कर्मचाऱ्यांनी आवश्यक ते सर्व साहित्य पिशव्यांमध्ये पॅकिंग केले. यामध्ये विविध लिफाफे, स्टेशनरी, दिशादर्शक फलक, मतदान प्रक्रीया पार पाडण्यासाठी आवश्यक साहित्य, ईव्हीएमचे बॅलेट युनिट कव्हर करणारे कंपार्टमेंट, पोस्टर, सूचना पत्र, लेखन सामग्री, स्टेशनरी, विविध नमुने, लिफाफे, बॅच बिल्ले, कागदी सील, मार्गदर्शक सूचना साहित्य सुमारे 24 साहित्याचा समावेश आहे. सोलापूर महापालिकेसाठी एकूण 353 ठिकाणी एकूण 1091 मतदान केंद्र आहेत. महापालिकेतील वितरण कक्षात 1250 स्टेशनरी किट, सुमारे 2 हजार 500 ईव्हीएमचे बॅलेट युनिट कव्हर करणारे कंपार्टमेंट हे साहित्य पॅक करून ठेवण्यात आले आहे. विविध ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात येणार आहे.

















