सोलापूर – अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास लहान मुलांना पावडर लावून बेशुद्ध करून पळवून नेणाऱ्या एका संशयित महिलेला सिध्दरामेश्वर नगर, विनायक नगर परिसरातील नागरिकांनी पकडून एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूरातील एमआयडीसी अक्कलकोट रोड सिध्दरामेश्वर नगर आणि विनायक नगर परिसरात सायंकाळच्या सुमारास एका संशयित महिलेने आपल्या जवळील पांढऱ्या रंगाच्या पावडरने लहान मुलांच्या अंगावर टाकून त्याला बेशुद्ध करून पळवून नेण्याचा प्रयत्न करत असताना या भागातील जागृत नागरिकांनी एकत्र येत संशयित महिलेला ताब्यात घेतले. महिलेच्या वागणूकीने नागरिक आणि महिला इतक्या संतप्त झाल्या की त्या महिलेला नागरिकांनी चांगलाच चोप दिला तेव्हा त्या संशयित महिलेने सुरूवातीला 5 जणांची टोळी असल्याची माहिती दिली नंतर पोलिसांनी आल्यावर त्यांनी निर्दोष असल्याचा आव आणला.
या महिलेच्या ताब्यातून पांढऱ्या रंगाची पावडर महिलांनी हिसकावून घेतली आहे. ती पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील घटनेची गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्या संशयित मुलांना पळवून नेणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले आहे. दरम्यान कालच महाराष्ट्रात मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती ऐकायला मिळाली आणि सोलापूरात याच प्रकरणावरून एका महिलेला जागृत महिलांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आता पोलिसांनी योग्य तो तपास करून खरीच अशा प्रकारची टोळी सक्रिय असेल तर मुळापर्यंत जाऊन याचा छडा लावला पाहिजे अशी मागणी आता नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.























