सोलापूर – सनातन वैदिक हिंदू धर्मातील महत्त्वाचा धार्मिक महिना म्हणून मार्गशीर्ष महिन्याकडे पाहिले जाते. या महिन्यात तीर्थक्षेत्र बाळे येथील श्री खंडोबा देवाची महिनाभर यात्रा भरते. यात्रेच्या तिसऱ्या रविवारी सोलापूर शहर जिल्ह्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील असंख्य भाविक श्रींच्या दर्शनासाठी मंदिरात पहाटेपासूनच दाखल झाले होते. “त्रिलोकीचा स्वयंभू” अशा मोठ्या अक्षरात फुलांची सजावट करण्यात आली होती. यामुळे सारे मंदिर परिसर उजळून निघाले होते. रविवारच्या यात्रेत अबालवृद्ध भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करत मुखी “येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे ” मल्हारी मार्तंड जयघोष करण्यात आला.
दरम्यान, श्रींचा गर्भगाभारा आकर्षक व सुवासिक फुलांनी सजवण्यात आला होता. यामुळे सर्वत्र नवचैतन्याचे आणि प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच पद्धतीने मंदिराच्या दर्शनी भागात फुलांच्या पाकळ्यांनी सजावट करण्यात आली होती. फुलांच्या पाकळ्यांनी सजावट केल्याने मंदिर परिसरात एक वेगळी शोभा निर्माण झाले होते. मंदिरात असंख्य भाविकांनी वारू सोडण्याचा कार्यक्रम संपन्न केला. अबालवृद्ध भाविकांना श्रींचे दर्शन घेण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेच्या माध्यमातून असंख्य भावीक दर्शन घेत असल्याचे दिसून येत आहे.
तत्पूर्वी दीपमाळेस तेल अर्पण केले. काही भाविकांनी नवस फेडण्याचा कार्यक्रम संपन्न केला. त्यामध्ये तळी भंडारा उचलणे, वारू सोडणे, लंगर तोडणे, अशा धार्मिक विधींचा समावेश होता. काही भाविकांनी लहान मुलांचे जावळ काढणे तसेच लग्न झाल्यानंतर जागरण गोंधळ करणे धार्मिक विधी देखील संपन्न केले. यात्रेच्या पहिल्या रविवारी भाविकांनी श्रींचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केल्याने सर्वत्र भाविकांची एकच गर्दी झाली होती. यात्रेच्या पहिल्या रविवारी सुमारे ४० हजारा भाविकांनी श्रींचे दर्शन घेतल्याची प्राथमिक माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली.
यात्रेच्या तिसऱ्या रविवारी भाविकांची मंदिरात आलोट गर्दी
मार्गशीर्ष महिन्यात श्री खंडोबा देवाची यात्रा सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील भरली आहे. यात्रेचा तिसरा रविवार भाविकांचे पहाटेपासूनच मंदिरात मोठी गर्दी झाली होती. मंदिर परिसरास तसेच श्रींच्या गर्भ गाभाऱ्यास आकर्षक अशा फुलांची तसेच पाकळ्यांची सजावट करण्यात आली. यासाठी सुमारे तीनशे किलोहून अधिक फुलांचा वापर करण्यात आला. तसेच मंदिरास विद्युत रोषणाई आणि भाविकांच्या सुविधेसाठी दर्शन रांगाची सोय करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशी माहिती मंदिर समितीचे सचिव सागर पुजारी यांनी दिली.
नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी घेतले श्रींचे दर्शन
सध्या लग्नसराईचा मौसम सुरू आहे. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी श्री खंडोबाचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी सहपरिवार मंदिर गाठले. नववधूला उचलून घेऊन मंदिरात प्रवेश करण्याच्या प्रथेप्रमाणे नवरदेवाने आपल्या नववधूला कडेवर उचलून घेत श्रींच्या मंदिरात प्रवेश केल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले.
श्री खंडोबा यात्रेच्या तिसऱ्या रविवारी तीर्थक्षेत्र बाळेतील खंडोबा मंदिरात भाविकांची झालेली गर्दी तर दुसऱ्या छायाचित्रात नवरदेवाने आपल्या नववधूला उचलून घेऊन मंदिरात प्रवेश करतानाचे टिपलेले हे छायाचित्र..



















