सोलापूर – अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीच्या प्रश्नावरून आंदोलन अधिक तीव्र होत असून, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांनी प्रशासनाला ‘अर्धनग्न उपोषणा’चा इशारा दिला आहे. कट्टीमनी हे २३ फेब्रुवारी २०२६ पासून सोलापूर येथील पुनम गेट परिसरात जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसले आहेत. मात्र, अद्याप संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांच्या अधिकारांचा वापर करून शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या केल्याचा विरोध संघटनेतर्फे करण्यात येत आहे. या निर्णयाविरोधात सुरू असलेल्या उपोषणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत, २५ मार्चपासून अर्धनग्न अवस्थेत उपोषण सुरू करण्यात येणार असून, तरीही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ३० मार्चपासून पूर्ण नग्न अवस्थेत आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाला दिले स्पष्ट इशारे
“मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने आंदोलनाची तीव्रता वाढवण्याशिवाय पर्याय नाही. शिक्षकांवर अन्याय होत असून, तो दूर होईपर्यंत लढा सुरूच राहील,” असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
– महांतेश्वर कट्टीमनी, आंदोलनकर्ते

























