सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले. यावर्षीच्या दिव्यांच्या सणाने अर्थात दिवाळीने प्रत्येकाचे आयुष्य नव्याने उजळून टाकले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सण साजरे करत असताना कायमस्वरूपी नोकरीची नियुक्ती पत्रे हातात येणे म्हणजे सणांचा उत्साह आणि रोजगार मिळाल्याचे यश असा द्विगुणित आनंद होय. हा आनंद आज देशभरातील 51,000 युवकांपर्यंत पोहोचला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यामुळे सर्वांच्या कुटुंबियांना अमाप आनंद मिळाल्याचे सांगून त्यांनी सर्व उमेदवारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. त्यांच्या आयुष्यातील नवीन आरंभाबद्दल त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
नव्याने नियुक्त झालेल्यांचा उत्साह, कठोर परिश्रम करण्याची क्षमता आणि पूर्ण झालेल्या स्वप्नांमधून मिळालेल्या आत्मविश्वासाचा उल्लेख करुन पंतप्रधान म्हणाले की जेव्हा ही चैतन्यदायी भावना राष्ट्रसेवेच्या भावनेशी जोडली जाईल, तेव्हा त्यांचे वैयक्तिक यश राष्ट्राच्या विजयात परावर्तित होते. नवनियुक्त सचोटी आणि निष्ठेने कार्य करतील तसेच भविष्यातील भारतासाठी एक उत्तम यंत्रणा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व नवनियुक्तानी “नागरिक देवो भव” हा मंत्र न विसरता सेवा आणि समर्पणाची वृत्ती जागृत ठेवून काम करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
गेल्या 11 वर्षांपासून राष्ट्र विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प घेऊन पुढे वाटचाल करत असताना, या प्रवासात देशातील युवक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. तसेच युवकांचे सक्षमीकरण हे आपल्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. रोजगार मेळावे हे तरुण भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एक शक्तिशाली माध्यम बनले आहेत, अलिकडच्या काळात या मेळाव्यांद्वारे 11 लाखांहून अधिक नियुक्ती पत्रे जारी करण्यात आली आहेत, असे ते म्हणाले. हे प्रयत्न केवळ सरकारी नोकऱ्यांपुरतेच मर्यादित नाहीत. केंद्र सरकारने पीएम विकसित भारत रोजगार योजनेच्या माध्यमातून 3.5 कोटी युवकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, असे ते म्हणाले. स्किल इंडिया मोहिमेसारख्या योजनांमुळे देशातील युवकांना आवश्यक प्रशिक्षण मिळत आहे तर राष्ट्रीय करिअर सेवा सारखे प्लॅटफॉर्म त्यांना नवीन संधींशी जोडत आहेत. या व्यासपीठाच्या माध्यमातून, 7 कोटींहून अधिक रिक्त पदांची माहिती तरुणांसोबत आधीच सामायिक करण्यात आली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधानांनी युवकांसाठीच्या “प्रतिभा सेतू पोर्टल” अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या मात्र निवड न झालेल्या प्रतिभावान तरुणांसाठी एका मोठ्या उपक्रमाची घोषणा केली. त्यांचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत, कारण खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही संस्था आता पोर्टलद्वारे या प्रतिभावान व्यक्तींशी संवाद साधत आहेत, असे ते म्हणाले. भारतातील युवा प्रतिभेचा पुरेपूर वापर केल्याने भारताची युवा क्षमता जगासमोर येईल, असे त्यांनी सांगितले.
जीएसटी बचत उत्सवामुळे सणासुदीचा काळ अधिक आनंददायी झाला आहे, असे मोदी यांनी सांगितले. देशभरात जीएसटी दरांमध्ये झालेल्या मोठ्या कपातींमुळे ग्राहकांची बचत तर वाढली आहेच, पण या सुधारणांमुळे रोजगारनिर्मितीलाही चालना मिळत आहेत. दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त झाल्यावर मागणी वाढते, मागणी वाढल्यावर उत्पादन आणि पुरवठा साखळीला गती मिळते आणि उत्पादनवाढीमुळे नवीन रोजगार निर्माण होतात, त्यामुळे जीएसटी बचत उत्सव हा रोजगार उत्सव बनत आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या काळातील विक्रमी विक्रीचा उल्लेख करताना सांगितले की, नवीन विक्रम प्रस्थापित झाले असून जुन्या सर्व सीमा ओलांडल्या गेल्या आहेत. या सर्व घडामोडी दाखवतात की जीएसटी सुधारणा देशाच्या अर्थव्यवस्थेला नवीन गती देत आहेत. या सुधारांचा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर तसेच किरकोळ व्यापारावर सकारात्मक परिणाम झाला असून उत्पादन, वाहतूक, पॅकेजिंग आणि वितरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नवीन रोजगार निर्माण होत आहेत, हेही नमूद केले. भारत हा सध्या जगातील सर्वात तरुण देश आहे आणि भारताची युवाशक्ती ही आपली सर्वात मोठी ताकद आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. हीच श्रद्धा आणि आत्मविश्वास भारताच्या प्रगतीचे मार्गदर्शन करत आहेत, परराष्ट्र धोरणातही आता भारतीय युवकांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतले जात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये आणि सामंजस्य करारांमध्ये युवकांचे प्रशिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मिती यांना प्राधान्य दिले जात आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या अलीकडील भेटीदरम्यान दोन्ही देशांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रांमध्ये गुंतवणूकवृद्धी करण्याचे ठरविले आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यान काही महिन्यांपूर्वी झालेल्या मुक्त व्यापार करारामुळेही नव्या संधी उपलब्ध होतील. याचप्रमाणे, अनेक युरोपीय देशांसोबत झालेल्या गुंतवणूक करारांमुळे हजारो नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. ब्राझील, सिंगापूर, कोरिया आणि कॅनडा यांसारख्या देशांसोबत झालेले करार गुंतवणूक वाढवतील, स्टार्टअप्स आणि एमएसएमईंना आधार देतील, निर्यात वाढवतील आणि भारतीय युवकांना जागतिक प्रकल्पांवर काम करण्याच्या नव्या संधी उपलब्ध करून देतील, असेही मोदी यांनी सांगितले.आज यश आणि दृष्टीकोनाविषयी ज्या चर्चा होत आहे, त्यात नव्याने नियुक्त झालेल्या युवकांचा मोठा वाटा असेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्यांनी विकसित भारताच्या ध्येयासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज व्यक्त केली व नवयुवक कर्मयोगी या संकल्पनेचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले. या प्रवासात ‘आय-जीओटी कर्मयोगी भारत’ या डिजिटल प्लॅटफॉर्मची उपयोगिता त्यांनी नमूद केली, ज्यावर आतापर्यंत सुमारे 1.5 कोटी सरकारी कर्मचारी शिकत आहेत. त्यांनी नव नियुक्त कर्मचाऱ्यांना या प्लॅटफॉर्मवर सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले, त्यामुळे चांगल्या कामकाजाची संस्कृती आणि सुशासनाची प्रेरणा निर्माण होईल, असे त्यांन सांगितले. त्यांच्या प्रयत्नांनीच भारताचे भविष्य घडेल आणि देशवासियांच्या स्वप्नांना मूर्त रूप मिळेल, असे म्हणत मोदी यांनी आपल्या संबोधनाची सांगता करत सर्व नव नियुक्त कर्मचाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.



















