पंढरपूर – पंढरपूर येथील संभाव्य कॉरिडॉर करण्याआधी राज्यकर्त्यांनी मंदिर परिसरातील संभाव्य बाधितांशी चर्चा केली पाहिजे. या भागातील स्थानिक लोकांवर होणारा हा तिसरा आघात असेल. जर हा कॉरिडॉर झाला तर या भागातील नागरिकांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे प्रतिपादन वडगावकर महाराज यांनी केले.
येथील तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थवर कॉरिडॉर रद्द व्हावा याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी खास सभेचे आयोजन केलेले होते. त्या सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शंकर महाराज गलगलकर, अध्यक्ष वडगावकर महाराज, कृती समितीचे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी (इचगावकर) , डॉ प्राजक्ता बेणारे, व्यंकटेश गलगलकर, अँड आशुतोष बडवे, रामकृष्ण महाराज वीर, अरविंद बेणारे, सामाजिक कार्यकर्ते आदित्य फत्तेपूरकर, शिरवळकर महाराज, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना वडगावकर महाराज म्हणाले अगोदर मास्टर प्लॅन केला, त्यानंतर टेंपल ऍक्ट आणून बडवे उत्पात, सेवाधारी यांची देवळातील सेवा संपुष्टात आणली. मंदिराचे सरकारीकरण केले आणि आता घरेदारे उध्वस्त करण्यात येत आहेत. अजून पुढे भविष्यात प्राधिकरणाचा धोका आहे, कॉरिडॉरचे पाच टप्पे असून मंदिर परिसरातील स्थानिक लोक उध्वस्त होणार आहेत, पंढरीचे सगळे अर्थकारण बिघडणार आहे.

दरवर्षी आषाढीवारी साठी कोट्यवधी रुपयांचा निधी येतो तो जातो कोठे असा संतप्त सवाल देखील उपस्थित केला, पुर्वी कुळकायदा आणून ब्राम्हणांच्या हजारो एकर जमिनी हडप केल्या, माझी स्वतः ची तीन हजार एकर जमीन गेली आहे. हा अन्यायकारी कॉरिडॉर भाविकांसाठी नाही, तर व्यावसायिक फायद्यासाठी केला जात आहे तो हाणून पाडला पाहिजे यासाठी एकजूट आवश्यक असून एकत्रित लढा दिला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
——————–
यावेळी बाबाराव महाजन म्हणाले, हे आजचे संकट पहिले नाही, याआधी मास्टर प्लॅन विरोधात आम्ही भूमिका घेतली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी खरे योग्य काम केले. डिपी प्लॅनचा निधी वळवून त्यांनी नदीपलीकडे ६५ एकर अर्थात भक्तीसागर उभा केला.
सुमित शिंदे म्हणाले, प्रमुख रस्ते मोठे करा, घरे दुकाने पाडून विकास होणार नाही. वैभव बडवे, आशिष राजहंस, अनिल जुमाळे यांनी आपल्या भाषणातून तीव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी मार्गदर्शन करताना अँड विनायक उंडाळे यांनी अनेक तांत्रिक त्रुटी दाखवून हा कॉरिडॉर पूर्ण घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट केले. व्यंकटेश गलगलकर यांनी समर्पक भाषेत शासनाच्या चुकीच्या धोरणांचा उल्लेख केला.
रामकृष्ण महाराज वीर म्हणाले, आम्ही कायमच कॉरिडॉरच्या विरोधात भूमिका घेत आहोत. वारकरी संप्रदायावर अविश्वास दाखवू नये, काळजी करु नका राज्यसभेचे माजी खासदार अँड.डॉ.सुब्रमण्यम स्वामी आपल्या सोबत आहेत. यावेळी बालाजी महाजन बडवे यांना मनोगत व्यक्त करताना अश्रू अनावर झाले ते म्हणाले कुणाचेच घर जाऊ नये.
कार्यक्रमाचे सुरुवातीला वैष्णव बडवे यांनी श्री विठ्ठलाचे आशीर्वाद, तर महेश आचार्य उत्पात यांनी श्री रुक्मिणी मातेचे आशीर्वाद तर अरविंद बेणारे यांनी सेवाधारांच्यावतीने आशीर्वाद दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्राजक्ता बेणारे यांनी केले. वैभव बडवे यांनी आभार मानले. सलग तीन तास सुरू असलेल्या या कॉरिडॉर विरोधी सभेस संभाव्य शेकडो बाधित नागरिक उपस्थित होते.
———————
राज्यकर्ते बालीश बुध्दीचे आहेत
तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर म्हणाले, बालिश बुद्धीचे राज्यकर्ते प्रत्येक तीर्थक्षेत्राला एकाच तराजूत तोलत आहेत. आम्ही शासनाला शहरातील अनेक मोकळ्या जागा दाखविल्या आहेत सुमारे २००एकर जागा विना वापर पडून आहेत, मंदिर परिसरातील भाविक सुरक्षित नाहीत, मंदिर सुरक्षित नाही. अन्यायकारी कॉरिडॉर एकजुटीने रद्द केला पाहिजे.
——————–
मंदिर परिसरातील सकारात्मक ऊर्जा दुसरीकडे मिळणार का ?
येथील सौ. सुलभा वट्टमवार म्हणाल्या की, कॉरिडॉर ही सततची टांगती तलवार आहे. कॉरिडॉरचा पैसा आम्हाला नको, इथे कुणाकडे पैसे नाहीत, सोन्यासारखी जागा गेल्यावर पैसे काय करायचे आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील सकारात्मक ऊर्जा दुसऱ्या जागेत मिळणार आहे काय ? असा सवाल उपस्थित करीत मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी कॉरिडॉर रद्द करून लाडक्या बहिणीसाठी या दिवाळीत ही भाऊबीज सणांची भेट देण्यात यावी असे सांगितले.
——————–
पुण्यात,शिर्डीत का होत नाही कॉरिडॉर ?
सामाजिक कार्यकर्ते आदित्य फत्तेपूरकर म्हणाले अनेकाना कॉरिडॉर मुळे अटॅक येत आहेत पुण्यातील लक्ष्मी रोड येथे श्री गणेश उत्सवात दहा दिवस पाय ठेवण्यासाठी जागा नसते मग तिथे कॉरिडॉर का होत नाही, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथील कॉरिडॉर रद्द करायला लावला.