ड्रायव्हिंग लायसन्स परवान्यासाठी लेखी परीक्षेपासून ते वाहन चालविण्याच्या चाचणीपर्यंत अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. तसेच त्यासाठी तासन् तास लांब रांगेत उभे राहावे देखील लागते.
पण आता या सर्व समस्यांपासून तुमची सुटका होणार आहे. कारण- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी नवीन नियम आणत आहे. या नियमांचे पालन केल्यास तुम्हाला चाचणी देण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही.
ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी सरकारने नियम बदलले आहेत. सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात व्यक्तींना ड्रायव्हिंग चाचणी देण्याची गरज नाही.
त्याऐवजी खासगी संस्थांना आता चाचण्या घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास अधिकृत करण्यात आले आहे की, ते प्रशिक्षणार्थींना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकतात. हे नियम 1 जून 2024 पासून लागू होतील.