कुर्डूवाडी – “पांढरी काठी दिनाचे” औचित्य साधून येथील आदर्श शाळेत दीपावलीनिमित्त अंध व्यक्तींसाठी ‘आनंदी शिधा : एक हात आपुलकीचा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम सक्षम प्रतिष्ठान व आदिशक्ती शिक्षण संस्था, वेताळवाडी, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा पुणे आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र जिल्हा शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सुरुवातीस हेलन केलर व लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह.भ.प. जयंत करंदीकर यांनी उपस्थित दृष्टिहीनांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही; दृष्टि नसली तरी सकारात्मक दृष्टिकोनाने आयुष्य जगावे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श पब्लिक स्कूलचे अध्यक्ष अमोल सुरवसे सर होते.त्यांनी आपल्या मनोगतात आदिशक्ती शिक्षण संस्था नेहमी अंधबांधवांच्या पाठीशी उभी राहील,असा विश्वास दिला. तसेच शासनाने अंध व्यक्तींना केवळ आरक्षण नव्हे, तर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत कोल्हे सर, आनंद पाटील तसेच संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील २०० दृष्टिहीन बांधवांना मिष्टान्न भोजन देऊन किराणा किट व पांढरी काठी वाटप करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात आला. कार्यक्रमात अनेक दृष्टिहीनांनी आपली कला आणि मनोगते सादर करून वातावरण उत्साहवर्धक बनवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रियाज शेख यांनी केले तर सूत्रसंचालन व आयोजक सक्षम प्रतिष्ठानचे संजय बैरागी सर यांनी प्रभावीपणे पार पाडले.