काँग्रेस पक्ष मोदी-शाह यांना टक्कर देऊ शकतो, हा आत्मविश्वास मल्लिकार्जुन खरगे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत खरगे पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरु शकतात.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने जागावाटप आणि ‘इंडिया’चा पंतप्रधानपदाचा चेहरा या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. सध्याच्या घडीला राष्ट्रीय राजकारणातील खरगे यांचे असलेले स्थान, इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये त्यांना असणारी सर्वमान्यता आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव हे घटक पाहता मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे इंडिया आघाडीच्या नेतृत्त्वाची धुरा दिली जाईल, अशी दाट शक्यता आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय राजकारणात मल्लिकार्जुन खरगे हे नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे.
गेल्या काही काळात काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून केलेल्या कामगिरीमुळे मल्लिकार्जुन खरगे या नावाला एकप्रकारे नवी झळाळी प्राप्त झाली आहे. वयाची ऐंशी उलटलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांच्या राजकारणाची ही सेकंड इनिंग अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण मानली जाते. अगदी वर्ष-दीड वर्षांपूर्वी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड होण्याआधीचा काळ पाहिला तर पक्षसंघटनेत मल्लिकार्जुन खरगे यांची ओळख ही काँग्रेसचा ज्येष्ठ नेता, गांधी घराण्याचा एकनिष्ठ आणि लोकसभेत आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडणारा नेता एवढ्यापुरताच मर्यादित झाली होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. खरगे हे काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते असले तरी राहुल गांधी यांच्या ‘यंग ब्रिगेड’च्या राजकारणात त्यांचा रोल फारसा महत्त्वाचा नव्हता. मात्र, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी कात टाकून राजकारणातील एका नव्या आणि आव्हानात्मक इनिंगला सुरुवात केल्याचे दिसते. कर्नाटक आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश पाहता त्यांनी हे आव्हान आतापर्यंत यशस्वीपणे पेलले, असे निश्चितच म्हणता येईल.
मल्लिकार्जुन खरगे यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते गांधी घराण्याच्या इशाऱ्यावर काम करतील, अशी चर्चा सुरु होती. परंतु, गेल्या वर्षभरात काँग्रेस पक्षातील संघटनात्मक पातळीवरील बदल, निवडणुकीतील रणनीती आणि व्युहरचना आणि काँग्रेसमधील जुन्या आणि बड्या खोंडांना आपापासातील हेवेदावे मिटवून पक्षासाठी कामाला लावणे, या सगळ्या आघाड्यांवर खरगे यांनी नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे. खरगे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली तेव्हा त्यांच्या वयाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता. ८१ वर्षांचे खरगे अध्यक्षपदाच्या जबाबदारीचा भार पेलू शकतील का, त्यांचा चेहरा कितपत अपिलिंग ठरेल, याबाबत अनेकांना शंका होती. परंतु, या पातळीवरही खरगे यांनी आश्चर्यकारकरित्या टीकाकारांचे सर्व दावे फोल ठरवले आहेत. त्यामुळे आजघडीला मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे काँग्रेस पक्षातील सर्वात आश्वासक आणि पक्षाला विजय मिळवून देऊ शकणारा नेता म्हणून पाहिले जात आहे.
कोण आहेत मल्लिकार्जुन खरगे?
आजघडीला काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या मल्लिकार्जुन खरगे यांचा जन्म २१ जुलै १९४२ रोजी कर्नाटकातील वरवट्टी येथे झाला. त्यावेळी कर्नाटकात निजामाची राजवट होती. खरगे यांच्या बालपणी भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांच्या गावात दंगल उसळली होती. त्यामुळे काही काळ त्यांच्या कुटुंबाला जंगलात आश्रय घ्यावा लागला होता. खरगे यांचे प्राथमिक शिक्षण गुलबर्गा येथील शाळेत झाले. गुलबर्गा येथील सरकारी महाविद्यालायतून खरगे यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर गुलबर्गातील सेठ शंकरलाल लाहोटी विधी महाविद्यालयातून खरगे यांनी कायद्याची पदवी मिळवली. गुलबर्ग्यातील पहिला दलित वकील होण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. वकिलीच्या कारकीर्दीत खरगे यांनी अनेक गरीबांचे खटले मोफत लढवले होते.
खरगेंचा राजकीय प्रवास
मल्लिकार्जुन खरगे यांनी कामगार संघटनेचा नेता म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी वकील म्हणून अनेक मजुरांचे कायदेशीर खटले पैसे न घेता लढवले होते. त्यामुळे गुलबर्गा शहरात मल्लिकार्जुन खरगे प्रचंड लोकप्रिय होते. विशेषत: दलित समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला. यामुळे खरगे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या नजरेत भरले. १९७० साली खरगे यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर १९७२ साली खरगे पहिल्यांदा गुरमटकल मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. तेव्हापासून खरगे काँग्रेस पक्षसंघटनेत एक-एक पायरी चढत वरपर्यंत पोहोचले. संसदेत काँग्रेस पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आपले मत परखडपणे मांडणारा आणि वेळ पडल्यास कोणालाही खडे बोल सुनावणारा नेता म्हणून ते ओळखले जातात. २०१४ साली काँग्रेस पक्षाच्या दारुण पराभवानंतर लोकसभेत खरगे यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाली होती. तेव्हापासून मल्लिकार्जुन खरगे हे सातत्याने मोदी सरकारविरोधात आक्रमकपणे आवाज उठवत आले आहेत.
मोदींविरोधात खरगे ट्रम्प कार्ड का ठरु शकतात?
मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्यामागे अनेक राजकीय गणितं दडली आहेत. गेल्या वर्षभराच्या काळात खरगे यांनी तळाला गेलेल्या काँग्रेसला नवी उभारी देण्याचे काम केले आहे. भाजपशी दोन हात करुन आपण जिंकू शकतो, हा आत्मविश्वास त्यांनी काँग्रेस आणि समविचार पक्षातील कार्यकर्त्यांना दिला आहे. ५० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय, सामाजिक, प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आणि केंद्रीय यंत्रणांपासून कोणतीही धोका नसलेली स्वच्छ प्रतिमा या मल्लिकार्जुन खरगे यांच्या जमेच्या बाजू आहेत. कर्नाटक आणि काँग्रेसमध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेल्या विजयात खरगे यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर उभा राहू शकेल, असे एकमेव नेता म्हणून खरगे यांच्याकडे पाहिले जात आहे.
इंडिया आघाडीतील अनेक पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी कितपत पटेल, याबाबत अद्यापही शंकेचे वातावरण आहे. यापैकी अनेक नेत्यांना इंडिया आघाडीचा नेता आणि पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्याची इच्छा आहे. या कारणांमुळे इंडिया आघाडीत अद्याप म्हणावा तसा एकजिनसीपणा येऊ शकलेला नाही. अशा परिस्थितीत खरगे हे सर्वांना पुढे घेऊन जाणारे नेते ठरु शकतात. खरगे हे ‘इंडिया’तील घटक पक्षांना आपलेसे वाटतात. याशिवाय, लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपला शह देण्यासाठी खरगे यांच्यासारखा दलित नेत्याचा चेहरा प्रभावी निवड ठरु शकते, असे इंडिया आघाडीतील घटकपक्षांचे मत आहे. त्यामुळे आता खरगे यांच्याकडे इंडिया आघाडीची सूत्रं आल्यास ते या अपेक्षांना कितपत न्याय देऊ शकतील, हे येणारा काळच ठरवेल.