सोलापूर – जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाच्या दरासंदर्भात कारखानदारांना निर्वाळीचा इशारा देत, शेतकऱ्यांना पहिली उचल ३४०० देण्याची मागणी करत आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बीबीदारफळ येथील लोकमंगल साखर कारखान्याचे गव्हाण बंद पाडून शेतकऱ्यांनी भजन आंदोलन केले.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील बीबीदारफळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह लोकमंगल साखर कारखान्यावर धडक मोर्चा काढला. अनेक शेतकऱ्यांनी गव्हानमध्ये ठिय्या मांडून साखर कारखान्याचे कार्य बंद पाडले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल ३४०० दिलीच पाहिजे, अशा घोषणा करत भजन आंदोलन सुरू केले. यामुळे कारखान्याचा व्यवहार ठप्प पडला.
गेल्या काही दिवसांपासून ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यांच्यात संघर्ष सुरू झालेला दिसत आहे. या वर्षाचा गळीत हंगाम सुरू झाला. तरी देखील अद्याप उसाचा दर जाहीर झाला नाही. काही कारखानदारांनी उसाचा दर जाहीर केला, नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. यापूर्वीच सोलापूर दौऱ्यावर आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांना तसेच प्रशासनाला ऊस दरा संदर्भात इशारा देताना कारखानदार आणि प्रशासनाला सावध केले होते. परंतु तरीदेखील कारखानदार आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागल्याचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
कोट
लोकमंगल साखर कारखान्यावर भजन आंदोलन करत वेधले लक्ष
जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसासाठी दिला जाणारा दर जाहीर करावा या मागणीसाठी रविवारी सकाळी बारा वाजता शेतकऱ्यांनी बीबी दारफळ येथील लोकमंगल साखर कारखान्यात प्रवेश करत गव्हाण बंद पाडली. भजन आंदोलन करून प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधण्यात आले. कारखानदारांनी पहिली उचल ३४०० इतकी जाहीर करावी, त्यानंतरच गळीत हंगाम सुरू करावा. ज्या साखर कारखानदारांनी अद्याप ऊस दर जाहीर केला नाही. तेथे उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.
– विजय रणदिवे जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

























