लातूर / उदगीर – साहित्यातील वास्तववाद, सामाजिक जाण, स्त्रियांची अवस्था, शेतकऱ्यांचे दु:ख, गरिबी, शोषण आणि मानवी संवेदनांचे सजीव चित्रण करत आपल्या साहित्यातून समजभान अत्यंत प्रभावीपणे उलगडणारे मुंशी प्रेमचंद हे भारतीय साहित्याचे निर्माते असून यांचे साहित्य म्हणजे समाजाचे दर्पण आहे. असे मत प्रा.अनिल चवळे यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात उपक्रमांतर्गत आयोजित ३४८ व्या वाचक संवाद मध्ये अहमदपूर येथील पर्यावरणवादी कवी प्रा.अनिल चवळे यांनी भारतीय साहित्यातील युगप्रवर्तक कथाकार, कादंबरीकार आणि समाजसुधारक मुंशी प्रेमचंद यांच्या जीवन, विचार आणि साहित्यावर आधारित व साहित्य अकादमी प्रकाशित “प्रेमचंद” या प्रकाशचंद्र गुप्त लिखित आणि चंद्रकांत बांदिवडेकर यांनी मराठीत अनुवादित केलेल्या ग्रंथावर अभ्यासपूर्ण विवेचन करताना ते म्हणाले की, मुंशी प्रेमचंद हे उपन्यास सम्राट होते. त्यांनी हिंदी आणि उर्दू दोन्ही भाषांत लेखन केले. उर्दूमध्ये त्यांचे टोपणनाव नवाब राय असे होते.
प्रेमचंदांचे लेखन हे केवळ साहित्य नसून समाजाचे सजीव दस्तऐवज आहे. त्यांनी शब्दांद्वारे न्याय, माणुसकी आणि समतेचा दीप प्रज्वलित केला.
प्रा. चवळे यांनी प्रेमचंद यांच्या कादंबऱ्यांतील सामाजिक संदेश व मानवी संघर्षाचे उदाहरण देत काही प्रमुख कादंबऱ्यांचे वर्णन केले , सेवासदन – स्त्रीजीवन, वेश्यावृत्ती आणि सामाजिक सुधारणा. प्रेमाश्रम – शेतकऱ्यांच्या शोषणाचे वास्तववादी दर्शन, रंगभूमि–औद्योगिक संघर्ष आणि गांधीवादी विचारांचे प्रतिबिंब, निर्मला– बालविवाह आणि स्त्रीशोषणाचा वेध, गबन- मध्यमवर्गीय समाजातील लोभ आणि दिखाऊपणावर टीका.
कर्मभूमि– स्वातंत्र्यलढा आणि सामाजिक जबाबदारी. गोदान– भारतीय शेतकऱ्यांच्या दु:ख, संघर्ष आणि आशेचे अमर चित्रण; ही कादंबरी त्यांच्या साहित्याचा शिखरबिंदू मानली जाते. ईदगाह – लहान हमीद आणि आजीमधील मायेचे कोमल चित्रण. कफन – गरिबी आणि संवेदनाहीनतेचा कडवा वास्तववाद. पूस की रात – शेतकऱ्याच्या आयुष्याची हृदयस्पर्शी झलक. ठाकुर का कुआँ – जातीय भेदभावावर प्रहार. पंच परमेश्वर – न्याय व विवेकाचे तत्त्वज्ञान. दो बैलों की कथा– जनावरांच्या माध्यमातून माणुसकीचे दर्शन. शतरंज के खिलाड़ी –नवाबांच्या विलासी जीवनावर व्यंग,नमक का दरोगा, सद्गति, बूढ़ी काकी–समाजातील नैतिक अध:पतनावर टीका करणाऱ्या या कथावर भाष्य केले.
यावेळी झालेल्या चर्चेनंतर अध्याक्षीय समारोप करताना अशोक नाईक म्हणाले की प्रेमचंद यांचे साहित्य आजही तितकेच वास्तववादी, व्यथा व्यक्त करणारे आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारे असून आजही ते तितकेच लागू पडते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रजपाल पाटील यांनी केले. संवादकाचा परिचय गोविंद सावरगावे यांनी दिला तर आभार मुरलीधर जाधव यांनी मानले.
या सोहळ्यास अहमदपूरचे कवी राजसाहेब कदम, शिवमूर्ती भातंबरे, कलावरती भातंबरे, तसेच उदगीर येथील साहित्यप्रेमी आणि प्रेमचंद अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते




















