सोलापूर – महामहिम राज्यपाल कार्यालय आयोजित महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा जगतातील एक महत्त्वपूर्ण असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आठ खेळातील सोळा संघाच्या सराव शिबिरास सुरुवात झाली.
यावर्षी या स्पर्धेचे आयोजन स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. सोलापूर विद्यापीठाकडून या महोत्सवासाठी खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांचा असा एकुण १८७ जणांचा मोठा चमू नांदेडकडे कूच करणार आहे. यात १६२ खेळाडू ( पुरुष व महिला), २४ संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक आणि १ स्पर्धा समन्वयक यांचा समावेश आहे. या स्पर्धेत अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, टेबल टेनिस, बॅडमिंटन व बुद्धिबळ या आठ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
या स्पर्धेच्या अनुषंगाने सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, आणि संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग डॉ. अतुल लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंच्या स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरांसाठी व तयारीसाठी विशेष नियोजन करण्यात आले.
बास्केटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, आणि बुद्धिबळ या खेळांच्या पुरुष व महिला संघांचे १० दिवसांचे स्पर्धा पूर्व सराव शिबीर विद्यापीठ परिसरात २२ नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. १ डिसेंबरपर्यंत हे शिबिर होणार आहे. या शिबिरामध्ये ११२ खेळाडू तसेच त्यांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक यांच्या निवासाची व भोजनाची उत्तम व्यवस्था विद्यापीठ परिसरात करण्यात आली आहे.
सरावासाठी व्हॉलीबॉल मैदान (फ्लड लाईटसह), बास्केटबॉल सिंथेटिक ग्राऊंड (फ्लड लाईटसह), कबड्डी मैदान (मॅटसह), आणि खो-खो मैदान यांसारख्या अद्ययावत सुविधा तयार करण्यात आल्या होत्या.
विद्यापीठ परिसराबाहेरील इतर ठिकाणी देखील खेळाडूंसाठी सराव शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. अॅथलेटिक्सचे शिबीर येथील डीबीएफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सच्या मैदानावर व टेबल टेनिसचे पार्क मैदानावरील मुळे पॅव्हिलियन हॉल मध्ये तर बॅडमिंटनचे कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथे सुरू आहे. या संपूर्ण तयारी आणि स्पर्धेसाठी बाळासाहेब वाघचवरे यांची क्रीडा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
—–
विद्यापीठाचे खेळाडू निश्चितच चांगली कामगिरी करतील
सोलापूर विद्यापीठाच्या या मोठ्या चमूची विद्यापीठ परिसरात व अन्य ठिकाणी विविध मैदानावर कसून तयारी सुरू आहे. या क्रीडा महोत्सवात सोलापूर विद्यापीठाचे खेळाडू निश्चितच चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा आहे.
-बाळासाहेब वाघचवरे, समन्वयक
——
हे आहेत विविध खेळाचे प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक
अॅथलेटिक्स : डॉ. अशोक पाटील, डॉ. किरण चोकाककर,धनंजय देशमुख.
बास्केटबॉल : डॉ. स्मिता सुरवसे, डॉ. महेश ढेंबरे, डॉ. प्रशांत तांबिले.
व्हॉलीबॉल : नंदकिशोर देशपांडे, खंडू चव्हाण, डॉ. सुरेश लांडगे.
कबड्डी : सुवर्णा कांबळे, विजय पवार, डॉ. रविंद्र कुनाळे.
खो-खो :डॉ. सुभाष मारकड, डॉ. शिवानंद तोरवी, विशाल होनमाने.
बॅडमिंटन : मकरंद भुजबळ, महादेव वाघमारे,.डॉ. समर्थ मनुकर.
टेबल टेनिस : गुलनार हरकारे,अनिल परमार प्रा. संतोष गवळी.
बुद्धिबळ :दिपक भोसले, जगदिश चेडे,डॉ. सुरेश भोसले.



















