सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला लवकरच पूर्ण वेळ कुलसचिव मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु ही प्रक्रिया परत लांबली आहे.
बुधवार २९ व गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी कुलसचिवासह १२ पदाच्या मुलाखती विद्यापीठात आयोजित केल्या होत्या. परंतु राज्य शासनाच्या ६ ऑक्टोंबर २०२५ च्या शासन निर्णयात नवीन गुणदान पद्धतीचा अवलंब केल्यामुळे या मुलाखती स्थगित करण्यात आल्याचे प्रभारी कुलसचिव अतुल लकडे यांनी कळविले आहे.
यापूर्वी विद्यापीठाच्या संविधानिक पदासह अध्यापकांच्या भरती प्रक्रियेमध्ये विविध शैक्षणिक पात्रतेला ८० व मुलाखतीसाठी २० अशी सरसकट गुणदान पद्धती होती. नियुक्ती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी शासनाने यात बदल केला आहे. आता संविधानिक पदासाठी शैक्षणिक पात्रतेसाठी ५० आणि अन्य पात्रता व मुलाखतीसाठी ५० तर अध्यापकांना शैक्षणिक पात्रतेसाठी ७५ व मुलाखतीसाठी २५ अशी गुणदान पद्धती निर्धारित केली आहे. त्यामुळे या मुलाखती स्थगित करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी विविध शैक्षणिक पात्रतेमध्ये गुणदान पद्धतीमध्ये ५० टक्के पेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे अनेक उमेदवार मुलाखतीसाठी अपात्र होत होते. ते आता मुलाखतीस पात्र होतील.
त्यामुळे आता या १२ रिक्त जागा भरण्यासाठी विद्यापीठाने परत जाहिरात दिली आहे. आता यापूर्वीच्या व नवीन पात्र उमेदवारांना २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
——
पात्र उमेदवाराच्या संख्येत वाढ होणार
यापूर्वीच्या गुणदान पद्धतीमध्ये प्रामुख्याने अध्यापक पदासाठी अनेक उमेदवार मुलाखतीस पात्र होत नव्हते. नवीन शासन निर्णयामुळे पात्र उमेदवार वाढणार आहेत. तसेच आणखी पात्र उमेदवारांना संधी मिळण्यासाठी आम्ही परत जाहिरात देण्याचा निर्णय घेतला आहे.
– प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र कुलगुरू
——
विद्यापीठात या नियुक्त होणार होत्या (पद व, संख्या) : कुलसचिव (१), अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान आणि मानव विज्ञान (२), संचालक नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ(२), प्रोफेसर (२), सहाय्यक प्राध्यापक (५).
——–


















