मंठा / जालना – ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मंठा तालुक्यातील देवठाणा (उ.) येथे उभारण्यात आलेल्या ५९ लाख रुपये खर्चाच्या नवीन आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्रांची नितांत गरज आहे. आजारपणाच्या वेळी प्राथमिक उपचारांसाठी गावाबाहेर जाण्याची अडचण दूर करण्यासाठी अशी आरोग्य उपकेंद्रे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. वेळेवर उपचार मिळाल्यास गंभीर आजारांचे प्रमाण कमी करता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन आरोग्य उपकेंद्रामुळे देवठाणा व परिसरातील नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा गावातच उपलब्ध होणार असून, याचा थेट फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार असल्याचेही आमदार लोणीकर यांनी नमूद केले. या केंद्रामार्फत मातृ व बाल आरोग्य सेवा, लसीकरण, प्राथमिक उपचार, आरोग्य तपासणी, सल्ला तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळणार आहे. विशेषतः गर्भवती महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक व गरीब कुटुंबांसाठी हे केंद्र वरदान ठरणार आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, कोणत्याही नागरिकाला उपचाराअभावी त्रास सहन करावा लागू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आमदार लोणीकर यांनी स्पष्ट केले. आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या आरोग्य उपकेंद्रात आवश्यक वैद्यकीय उपकरणे, औषधसाठा, स्वच्छता व्यवस्था तसेच प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी उपलब्ध करण्यात येणार आहेत. या केंद्रामुळे आजारांचे लवकर निदान होऊन रुग्णांना वेळेवर व योग्य उपचार मिळण्यास मदत होणार आहे. यासोबतच आरोग्य जनजागृती, पोषण आहार मार्गदर्शन व रोगप्रतिबंधक उपाययोजनांवरही भर देण्यात येणार असल्याचे आमदार लोणीकर यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी या आरोग्य उपकेंद्रामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामस्थांनी शासन व लोकप्रतिनिधींचे आभार मानत या केंद्राचा योग्य व प्रभावी वापर करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी गणेशराव खवणे, नितीन राठोड, राजेश मोरे, पंजाबराव बोराडे, डॉ. दत्तात्रय काकडे, भाऊसाहेब गोरे, अजय अवचार, विठ्ठलराव काळे, शिवाजीराव जाधव, विलास घोडके, सुरेश सरोदे, रामकिसन बोडके, गजानन देशमुख, अमोल मोरे, दारासिंग चव्हाण, पंकज राठोड, पवन खंदारे, किशोर खंदारे, गोविंदराव देशमुख, विष्णुपंत मोरे, शरद पाटील, रामेश्वर देशमुख, विष्णू राठोड, प्रवीण शेजुळे, रमेश मोरे, पप्पू मोरे, बाबासाहेब मोरे, रघुनाथ शिंदे, भगवान देशमुख, जनार्दन मोरे, आसाराम मोरे, सोपानराव पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























