सोलापूर – ग्रामदैवत गुरु रेवणसिद्ध यात्रेनिमित्त २० मार्च रोजी आयोजित भव्य कुस्ती मैदानात प्रेक्षकांची प्रचंड गर्दी उसळली होती. पंचक्रोशीसह जिल्ह्यातील नामांकित पैलवानांनी या मैदानात दमदार हजेरी लावत चुरशीच्या लढती रंगवल्या. शंभर रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतच्या कुस्त्यांनी दिवसभर मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
मैदानातील अंतिम आणि मानाची कुस्ती हराळवाडीचा पै. रामा शेळके आणि सांगलीचा पै. राजकुमार पाटील यांच्यात रंगली. एक लाख रुपयांच्या इनामासाठी झालेल्या या लढतीत रामा शेळके यांनी अप्रतिम लपेट डाव टाकत राजकुमार पाटील यांना चितपट केले. या शानदार विजयामुळे रामा शेळके यांना रोख एक लाख रुपये व चषक देऊन मानाचा “गुरु रेवणसिद्ध केसरी” किताब बहाल करण्यात आला. उपविजेता पै. राजकुमार पाटील यांना २० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती ७५ हजार रुपयांची ठेवण्यात आली होती. या लढतीत पुळुजचा पै. नव्हतेज कोंडकर याने मोहोळच्या पै. विक्रम गायकवाड याच्यावर मात करत बक्षीस पटकावले. विजेत्या पैलवानांना रोख रक्कम, मानचिन्ह आणि फेटा बांधून सन्मानित करण्यात आले.
या कुस्ती मैदानासाठी पै. रवि शेळके, विठ्ठल हराळे, पै. सिद्धू माने, पै. रवि पवार, पै. सोन्याबापू ऐवळे, पै. रंगसिद्ध शेळके, विलास शेळके, पै. रोहित शेळके यांनी पंच म्हणून काम पाहिले. तर पै. रवि शेळके, पै. सचिन हेगडे, आदींनी परिश्रम घेतले.
आयोजकांच्या उत्तम नियोजनामुळे संपूर्ण कुस्ती स्पर्धा उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. या वेळी वस्ताद मंडळी व कुस्तीप्रेमी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.






















