सोलापूर : सोलापूरच्या यंत्रमाग उद्योजकांनी आपल्या उत्पादनांची दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी अत्याधुनिक डाईंग पद्धतीचा अवलंब करावा, असा सल्ला जगात सर्वाधिक रंगरसायने बनविणाऱ्या आरक्रोमा इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अंजनीकुमार प्रसाद यांनी सोमवारी सोलापुरात दिला.
आरक्रोमा इंडिया कंपनीतर्फे व टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन सोलापूरच्या सहकार्याने एमआयडीसीतील टीडीएफ हॉलमध्ये आयोजित ‘इनोव्हेशन अँड सस्टेनबिलिटी इन टेक्स्टाईल प्रोसेसिंग’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कंपनीचे सेल्स लीडर तथा एरिया सेल्स मॅनेजर प्रणव गायत्री, कंपनीचे अकाउंटंट मॅनेजर (सेल्स) भूपेंद्र झाडे, जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, टीडीएफचे अध्यक्ष श्रीनिवास बुरा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
याप्रसंगी अंजनीकुमार प्रसाद पुढे म्हणाले की,
सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगासमोर देशी मार्केट,निर्यात याविषयी अनेक आव्हाने आहेत. या आव्हानावर त्यांना विविध उपाययोजना करून मात करावी लागेल. याचबरोबर शासनाने या लघु उद्योगाला संरक्षण देणे गरजेचे आहे. या उद्योगात आधुनिकीकरणाबरोबर चांगल्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवणे शक्य आहे. मार्केटिंगचा मोठा अभाव या उद्योगात दिसून येतो. त्यामुळे मार्केटिंग वाढवण्यावर भर द्यावा लागेल.
केवळ चादर टॉवेल या दोनच उत्पादनापुरती मर्यादित न राहता इतर उत्पादनांमध्ये प्रवेश करणे गरजेचे आहे. या उद्योगाला कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी सोलापुरात प्रशिक्षण केंद्राची नितांत गरज आहे, असे अंजनीकुमार प्रसाद म्हणाले.
शासनाने नागपूर व अमरावती येथे क्लस्टर उभारले, मग देशातील प्रमुख अशा वस्त्रोद्योग केंद्रांपैकी एक असलेल्या सोलापुरात क्लस्टर का नाही? असा सवाल उपस्थित झाला आहे. येथील टेक्स्टाईल उद्योगाच्या प्रगतीसाठी क्लस्टरची नितांत गरज आहे. शासनाने या उद्योगासाठी मुबलक पाणीपुरवठा करावा तसेच जागा, पायाभूत सुविधांसाठी अनुदान उपलब्ध करावे, असेही अंजनीकुमार प्रसाद यांनी सांगितले.
कार्यक्रमास टीडीएफचे सिध्देश्वर गड्डम,
संजय मडूर, गोविंद झंवर,गोवर्धन चाटला, जगदीश कोडम, नारायण आडकी,श्रीकांत येमुल
सत्यनारायण गुर्रम,रामनारायण आडम
कालिदास माणेकरी, श्रीनिवास कोडम
गिरिष मादास यांच्यासह यंत्रमागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















