सोलापूर : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार प्रभागनिहाय मतदार यादी मतदार यादी विभाजनाचे कार्य अचूकता, पारदर्शकता व वेळबद्धता या तत्वांवर आधारित असावे. नागरिकांच्या अधिकाराशी निगडित हे अत्यंत महत्त्वाचे काम असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने व प्रामाणिकपणे ते पार पाडावे, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीच्या आधारे प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार एकूण २६ प्रभागांकरिता प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम सुरु करण्यात आले आहे.

या कामकाजाच्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागाकरिता स्वतंत्र टीम नियुक्त करण्यात आली असून, नियुक्त कर्मचाऱ्यांना आज सोलापूर महानगरपालिका कौन्सिल हॉल येथे मतदार यादी विभाजनासंदर्भात सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपआयुक्त तैमूर मुलाणी, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर तसेच निवडणूक विभागाचे अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षण सत्रास सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी उपस्थित राहून सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदार यादी विभाजनाचे कार्य अचूकता, पारदर्शकता व वेळबद्धता या तत्वांवर आधारित असावे. नागरिकांच्या अधिकाराशी निगडित हे अत्यंत महत्त्वाचे काम असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने व प्रामाणिकपणे ते पार पाडावे, असे निर्देश त्यांनी दिले.
या कामासाठी नियुक्त टीमकडून प्रभागनिहाय घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून, प्रभागाच्या निश्चित हद्दीनुसार मतदारांची माहिती पडताळून पाहणी करण्यात येणार आहे. या प्रक्रियेद्वारे अंतिम मतदार यादीत समाविष्ट होणाऱ्या मतदारांची नोंद तपासून, प्रभाग निहाय मतदार याद्या करण्यात येणार आहे.