सोलापूर – महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीने मांडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सर्व व्यापारी संघटनांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या समवेत व्यापारी कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीतर्फे मांडण्यात आलेल्या महत्वाच्या ६ विषयांवर सुमारे दिड तास सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये मंत्री रावल यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या बाजार समित्यांमधील विविध प्रश्नांवर सकारात्क चर्चा केली.
महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने मांडलेल्या महत्वाच्या ४ विषयांबाबत सकारात्क निर्णय घेण्याचे ठरले. तसेच २ मुख्य विषयांवर लवकरच पुन्हा एकदा मिटिंग घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहे. या बैठकीत पणन संचालकांसह पणन विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, त्यांच्या समवेत देखील सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृती समितीचे सदस्य व सोलापूर भुसार आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश चिक्कळी यांनी दिली.
यावेळी दि पूना मर्चेंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, माजी अध्यक्ष रायकुमार नहार, नवीन गोयल, फॅमचे सचिव प्रीतेश शहा, ग्रोमाचे अध्यक्ष भिमजी भानुशाली, कॅमेटेचे अध्यक्ष दिपेन अगरवाल, भुसार आडत व्यापार संघ सोलापूरचे अध्यक्ष सुरेश चिक्कळी, सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई व शरद शहा, दि बारामती मर्चेंटस् असो. चे अमोल शहा, निलेश दोशी व निलेश भिंगे, गोंदिया जिल्हा व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष किरण मुंदडा, अपूर्व अगरवाल, औरंगाबाद मर्चेंटस् असो. चे अध्यक्ष हरीष पवार व सचिव राकेश जैन, नाशिक किरणा घाऊक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, सुनील मुंदडा व राज्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


















