अक्कलकोट – मोठ्या प्रमाणावर वाहनांची खरेदी-विक्री होत असली तरी अनेक नागरिकांकडून वाहन विकल्यानंतरही त्याची मालकी हक्क हस्तांतरण प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जात नाही. ही बाब कायदेशीर दृष्ट्या गंभीर असून भविष्यात मोठ्या आर्थिक व कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते, असा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी दिला आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार वाहन विक्री केल्यानंतर ३० दिवसांच्या आत, तसेच वाहन इतर राज्यात विक्री झाल्यास ४५ दिवसांच्या आत संबंधित आरटीओ कार्यालयात मालकी हस्तांतरणासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. मात्र अनेकदा केवळ खरेदी-विक्रीचे कागद करून व्यवहार पूर्ण झाल्याचे समजले जाते आणि आरटीओ रेकॉर्डमध्ये मालकाचे नाव बदलले जात नाही.अशा परिस्थितीत संबंधित वाहनाचा अपघात, गुन्हा, वाहतूक नियमभंग किंवा ई-चलन झाले, तर त्याची सर्व कायदेशीर जबाबदारी ही जुन्या मालकावरच राहते. त्यामुळे जुनी वाहन विकल्यानंतर ती आपल्या नावावरून अधिकृतरीत्या ट्रान्सफर झाली आहे की नाही, याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे आरटीओ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मालकी हस्तांतरणासाठी मूळ नोंदणी प्रमाणपत्र (RC), फॉर्म क्रमांक २९ व ३०, वैध विमा, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, पत्ता पुरावा, पॅन कार्ड आदी कागदपत्रांची आवश्यकता असते. ही संपूर्ण प्रक्रिया आता ‘परिवहन’ पोर्टलद्वारे ऑनलाईन सोप्या पद्धतीने करता येते.
जुनी वाहन एक्सचेंज करताना केवळ वाहनाच्या किंमतीकडे लक्ष न देता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, याची खात्री करणे नागरिकांच्या हिताचे आहे. हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निष्काळजीपणा केल्यास भविष्यात गंभीर अडचणी उद्भवू शकतात.या प्रक्रियेदरम्यान नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास ९४२०५६४५१३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे. वाहन विक्री केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच निश्चिंत व्हावे, असे आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


















