पंढरपूर – येथील वैकुंठ स्मशानभूमी मध्ये समस्यांची अक्षरश: मांदियाळी दिसून येते आहे. त्यामुळे एखाद्या आप्तस्वकीयांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत आलेल्या महिला, वृध्दांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पालिकेने वैकुंठ स्मशान भूमीतील समस्यांकडे गांभिर्याने लक्ष देवून त्या सोडविण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे शहरातील नागरिकांतून बोलले जात आहे.
शहरात एकमेव वैकुंठ स्मशानभूमी आहे. उपनगरातील टाकळी भागात एक स्मशानभूमी असून तीचे अस्तित्व केवळ नावापुरतेच आहे. कारण या उपनगरातील स्मशानभूमीत कोणत्याही सुविधा नाहीत.आत्तापर्यंत पंधरा, वीस वर्षात केवळ एक, दोन जणांच्या मृतदेहावर या स्मशानभूमीत केवळ (शहरात पुरपरिस्थिती गंभीर असल्यामुळे मुख्य वैकुंठ स्मशानभूमीत पाणी होते ) नाईलाजास्तव अंत्यसंस्कार करावे लागलेले आहेत. त्यामुळे शहर आणि उपनगरातील नागरिकांना गावाभागा मध्ये असलेल्या एकमेव वैकुंठ स्मशानभूमीतच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. मात्र गेल्या कित्येक महिन्या पासून या वैकुंठ स्मशानभूमीला देखील पालिकेच्या दुर्लक्षामुळे एक ना अनेक समस्यांनी ग्रासलेले दिसत आहे.
या वैकुंठ स्मशानभूमीतील सर्वात महत्वाची अडचण म्हणजे या ठिकाणी अंत्यसंस्कारा साठीचे कट्टे किंवा चबुतऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे एकाच दिवशी अनेक मृतदेह अत्यसंस्कारासाठी आल्यावर प्रत्येक मृतदेहासाठी स्वतंत्रपणे कट्टे किंवा चबुतरे उपलब्ध होत नाहीत. अनेकांना कट्यां शिवाय खाली जमीनीवरच किंवा एकाच कट्यांवर दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतात.
या स्मशानभूमीत ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात तेथील चबुतऱ्याच्या किंवा कट्यांची जमीन देखील एकसारखी सपाट दिसत नाही. अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असल्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी रचलेले सरपण किंवा लाकडे देखील ढासळली जातात. या बरोबरच स्मशानभूमीत पाण्यासाठी असलेला हातपंप हा देखील खूप दूरअंतरावर असल्यामुळे वयोवृध्द नागरिकांचे हाल होतात. पावसाळ्यात अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना उभारण्यासाठी जवळच आडोसा किंवा एखादे पत्राशेड नसल्यामुळे देखील नागरिकांना अडचणीचे होते.
येथील वैकुंठ स्मशानभूमीत मोकाट जनावरांचा सर्रास वावर दिसुन येतो. त्याला देखील प्रतिबंध करण्याची गरज आहे. स्मशानभूमीत सर्वत्र काटेरी वनस्पती वाढलेल्या दिसतात. त्यामुळे पालिकेने या काटेरी वनस्पती काढून त्या ठिकाणी सावली देणाऱ्या डेरेदार वृक्षांचे वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. त्यामुळे स्मशानभूमीचा परिसर देखील प्रसन्न होण्यास मदत होईल. स्मशानभूमीत बसण्यासाठी बाकडे आहेत मात्र त्याची देखील संख्या अपुरी आहे. झाडांच्या कडेला गोल कट्टे बांधलेले आहेत मात्र त्या ठिकाणी तेलकट तांबड्या मोठ्या मुंग्याची मांदियाळी असते. त्यामुळे बसलेल्या माणसाला या मुंग्या चावल्या तर त्याची काही धडगत उरत नाही. गेल्या तीन ते चार वर्षापासून पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती आहे. त्यामुळे नगराध्यक्ष, नगरसेवकांचा कोणताही हस्तक्षेप नाही. तरी देखील पालिका आधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे स्मशानभूमीस देखील अनेक समस्यांनी ग्रासल्याचे दिसून येत आहे. या समस्या दूर करण्यासाठी पालिकेच्या आधिकाऱ्यांनी जाणीवपुर्वक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
———————————
पालिकेकडून नियमीत स्वच्छतेची गरज
या बरोबरच स्मशानभूमीला देखील बकाल अवस्था आलेली दिसत आहे. कारण स्मशानभूमीत नियमीत स्वच्छता ठेवली जात नाही. अंत्यसंस्कारा नंतर स्मशानभूमीत लाकडी बांबू, मृतदेहाच्या अंगावरील कपडे, कापसाच्या उश्या तसेच गाद्या या बरोबरच प्रेताच्या गळ्यातील फुलांचे हार, फुटकी मातीची मडकी, काचेच्या बांगड्या, राँकेलचे कँन आदी सामान सर्वत्र पडलेले दिसुन येतात. त्यामुळे स्मशानभूमीत नियमित साफसफाईची गरज आहे.
—————————–
कायमस्वरुपी सुरक्षा व सीसीटिव्हीची व्यवस्था आवश्यक
येथील स्मशानभूमीत वेडेभिक्षेकरी, गांजा ओढणारी मंडळी, दारुडे, जुगारी, वाळु चोरटे,मटका घेणाऱ्या मंडळींचा सततचा वावर असतो. या ठिकाणी अनेक अवैध प्रकार किंवा धंदे देखील दिवसरात्र सुरु असतात. त्यामुळे या मंडळींना चाप बसण्यासाठी पालिकेने या ठिकाणी कायमस्वरुपी सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज आहे. या बरोबरच या ठिकाणी सीसीटिव्ही यंत्रणेची देखील गरज आहे. त्यामुळे उपद्रवी (दारुडे, जुगार, मटका घेणाऱ्या) मंडळींना चांगली जरब बसुन येथे चालणारे अवैध प्रकार किंवा धंदे बंद होण्यास मदत होईल.



















