भारत सरकारच्या क्षयमुक्त भारत अभियान अंतर्गत शहरात सोलापूर महापालिकेच्या शहर क्षयरोग केंद्राच्या वतीने एप्रिल 2024 पासून क्षयरोग निर्मूलन लसीकरणासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर मे महिन्यापासून लसीकरण अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी आणि डॉ. प्रसाद कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र सरकारने क्षयमुक्त भारत अभियान राबविले आहे. त्या अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कक्ष व आय सी एम आर यांच्या संयुक्त विद्यमाने एडल्ट बीसीजी वॅक्सिनेशन कॅम्पिंग हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात 40 जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. अंदाजे 1.2 कोटी नागरिकांचे लसीकरण अपेक्षित आहे. क्षय रोग औषधोपचाराने बरा होतो. रुग्णांनी घाबरण्याची गरज नाही. महापालिकेच्या विविध दवाखान्यात मोफत औषधोपचार उपलब्ध आहे, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. सोलापूर महापालिका क्षेत्रात सुद्धा हा प्रकल्प राबविण्यात येणार असून शहरात अंदाजे 2 लाख 15 हजार 618 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. महापालिकेकडील सर्व वैद्यकीय अधिकारी जीएनएम, एएनएम, आशा वर्कर्स व क्षयरोग विभागाकडील कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. दि. 1 एप्रिल पासून आशा वर्कर यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत 18 वर्षावरील सहा गटातील लाभार्थ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. मागील पाच वर्षात क्षयरोग झाला होता अशा व्यक्ती, साठ वर्षावरील सर्व व्यक्ती, धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, क्षय रुग्णांच्या सानिध्यातील व्यक्ती , मधुमेह असलेल्या व्यक्ती व ज्यांचा बीएमआय 18 पेक्षा कमी आहे अशा व्यक्ती हे यालसीकरणाचे लाभार्थी आहेत, असेही आरोग्य अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.