सोलापूर – शहरासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी करत ऑर्किड कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या दोन विद्यार्थिनींची पॅरिस (फ्रान्स) येथील जागतिक कीर्तीच्या सुपमेका येथे पूर्णतः प्रायोजित चार महिन्यांच्या आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. मेकॅनिकल व एरोस्पेस अभियांत्रिकी क्षेत्रातील हे विद्यापीठ जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त आहे.
मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील स्नेहल शिंदे आणि इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागातीलसमीक्षा सत्रे या विद्यार्थिनी १६ फेब्रुवारी २०२६ ते १५ जून २०२६ या कालावधीत प्रगत शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण घेणार आहेत. या दोघींना ला फाउंडेशन यांचे पूर्ण आर्थिक प्रायोजन मिळाले असून फ्रेंच विद्यापीठाकडून १,३०० युरो शिष्यवृत्ती तसेच दरमहा ६७० युरो स्टायपेंड दिला जाणार आहे. इंटर्नशिपदरम्यान त्या “गाईडन्स, नेव्हिगेशन अॅण्ड कंट्रोलसाठी मॉड्युलर ड्रोन अरेनाचे डिझाईन” आणि “इंडस्ट्री ५.० उत्पादन लाईनचे मेकॅट्रॉनिक्स मॉडेलिंग” या अत्याधुनिक प्रकल्पांवर काम करणार आहेत. ड्रोन तंत्रज्ञान, एम्बेडेड सिस्टीम्स, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्री एकत्रीकरण यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांना जागतिक दर्जाचा अनुभव मिळणार आहे.
या प्रकल्पासाठी डॉ. श्रीनिवास एस. मेतन प्रोजेक्ट मेंटर म्हणून मार्गदर्शन करणार असून पॅरिस येथील प्रा. रोमन डेलाबेये यांच्या सहकार्याने संयुक्त संशोधन होणार आहे. संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य व प्राध्यापकांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करत त्यांच्या यशाचे कौतुक केले. सोलापूरसारख्या शहरातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संशोधनाची संधी मिळणे ही अभिमानाची बाब असून, ऑर्किड कॉलेजची वाढती आंतरराष्ट्रीय ओळख या यशातून अधोरेखित झाली आहे.





















