सोलापूर : शहरातील अशोक चौक, पाथरूट चौक परिसरातील सोलापूर पोलीस मुख्यालय वसाहतीच्या संरक्षक भिंतीलगत अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले अनधिकृत सुमारे 70 ते 80 खोके जेसीबीच्या साह्याने जागेवरच निष्काशीत करण्यात आली. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज सकाळी ही मोठी कारवाई करण्यात आली.
सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही धडक मोहीम राबवित परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई केली. गेल्या काही महिन्यांपासून संबंधित ठिकाणी पत्रा शेड मारून टपऱ्या व खोके उभारण्यात आले होते. यामुळे वाहतूक कोंडी वाढत होती. पोलीस मुख्यालय परिसरातील सार्वजनिक जागेत अडथळा होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर या विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई हाती घेतली.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंम्बासे यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे पथक, जेसीबी यंत्रणा आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसर सील करत खबरदारी घेतली. काही व्यावसायिकांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. कारवाईदरम्यान अनधिकृत खोके हटवून जागा मोकळी करण्यात आली.
दरम्यान, शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि शासकीय इमारतीलगत असलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी पुढील काळातही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे. शहरात शिस्तबद्ध आणि अडथळामुक्त रस्ते करण्यासाठी अतिक्रमणांविरोधातील मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचेही अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी स्पष्ट केले.























