तभा फ्लॅश न्यूज/नवीन नांदेड : महाराष्ट्र राज्य सह नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर दुर्दैवी दुःखाच्या घटना घडल्या यामध्ये जीवित व आर्थिकहानी मोठ्या प्रमाणात होऊन या दुर्दैवी घटनेत मोठ्या प्रमाणावर गुरे ढोरे मृत्युमुखी पडले हा दुःखद घटना डोळ्यासमोर असतानाही सिडकोत भाजपच्यावतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
सिडको येथे गोकुळाष्टमीचे अवचित्य साधून दहीहंडी महोत्सवाचे आयोजन भाजपच्या वतीने दिनांक २२ ऑगस्ट रोजी हडको येथे नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
सदरील दहीहंडीचे मुख्य आकर्षण गौतमी पाटील हे होते. गौतमी पाटील यांच्या नृत्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पण महाराष्ट्र राज्यसह नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर व सामान्य जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही भारतीय जनता पार्टीने दहीहंडीच्या निमित्ताने गौतमी पाटील यांच्या नृत्याचा आनंद घेतला. एकीकडे पूरग्रस्तांना मदतीच्या हाताची गरज आहे.
दुसरीकडे सांस्कृतिक कार्यक्रम राबवून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी शक्ती प्रदर्शन होत असल्याची चर्चा कार्यक्रमानंतर नागरिकांमध्ये चालू होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शक्ती प्रदर्शनाची गरज नसून स्थानिक मतदारांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याची गरज आहे अशी चर्चा येथील मतदार व ज्येष्ठ नागरिकांतून होत होती.