नवी दिल्ली – केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी भारत सरकारच्या मालकीच्या अलायन्स एअर या प्रादेशिक कंपनीच्या “फेअर से फुरसत” या ऐतिहासिक उपक्रमाचे उद्घाटन केले. सतत बदलत राहणाऱ्या विमानप्रवास भाड्याच्या चिंतेपासून प्रवाशांना मुक्तता मिळवून देणे आणि देशातील हवाई वाहतुकीतील सुलभता वाढवणे हा या फेअर से फुरसत उपक्रमाचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत, अलायन्स एअर ही कंपनी, बुकिंगची तारीख लक्षात न घेता अगदी उड्डाणाच्या दिवशी देखील सारखेच निश्चित भाडे आकारणार आहे. या नव्या सुविधेची परिचालनात्मक व्यवहार्यता आणि प्रवाशांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी 13 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत निवडक मार्गांवर प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना, केंद्रीय मंत्री म्हणाले, ““फेअर से फुरसत” ही योजना उडान योजनेच्या मुख्य तत्वांशी उत्तम प्रकारे जुळणारी आहे. हवाई वाहतूक क्षेत्राचे लोकशाहीकरण करुन विमानप्रवासाचा खर्च मध्यम वर्ग, निम्न-मध्यम वर्ग तसेच नव-मध्यम वर्ग यांना परवडेल असा स्वरूपाचा करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न आज, अलायन्स एअर ही कंपनी पुढे नेत आहे.” स्थिर विमानभाडे प्रणाली, सतत बदलत्या विमानप्रवास भाड्याशी संबंधित अनिश्चितता तसेच तणाव दूर करते आणि अगदी शेवटच्या क्षणी देखील बुकिंग साठी खर्चाचा अंदाज लावता येईल अशी ठेवते.

या प्रादेशिक विमान सेवेचे योगदानावर अधिक भर देत केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनी अलायन्स एअर या कंपनीला सरकारच्या उडान या प्रादेशिक संपर्क योजनेचा कणा असे संबोधले आहे. ही विमानसेवा दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरावरील शहरांना राष्ट्रीय हवाई वाहतूक जाळ्याशी जोडते. “अलायन्स एअर कंपनीने एक मार्ग, एक विमानप्रवास भाडे या संकल्पनेसह एक धाडसी तसेच अनुकरणीय पाऊल उचलले आहे. ही खरोखरीच ‘नये भारत की उडान’ असून यात नफ्याच्या पलीकडे जाऊन विचार करत सार्वजनिक सेवांवर लक्ष केंद्रित करणारी सुविधा आहे,असे ते म्हणाले.”
भारतातील हवाई उड्डाण विषयक बाजारपेठ मुख्यत्वे करून गतिशील किमतीच्या नमुन्यानुसार चालते आणि त्यात मागणी, ऋतुमान आणि स्पर्धात्मकता यांच्या नुसार वास्तव वेळी तिकिटांचे दर बदलत राहतात. महसूल व्यवस्थापनासाठी हे परिणामकारक असले तरीही त्यातून बहुतेकदा शेवटच्या क्षणी अप्रत्याशित दरांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. विमान प्रवासाच्या दरांमध्ये पारदर्शकता आणि स्थैर्य आणून या दीर्घकाळ प्रलंबित आव्हानावर उपाय शोधणे हे या “फेअर से फुरसत” या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
पहिल्यांदाच विमान प्रवास करणाऱ्या छोट्या शहरांतील लोकांना विमान प्रवासाचा पर्याय निवडण्यासाठी हा उपक्रम प्रोत्साहित करेल आणि त्यायोगे विमान प्रवास सर्वसामान्यांसाठी सुलभ आणि परवडण्याजोगा करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाला बळकटी मिळेल.
अलायन्स एअर ही कंपनी देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत हवाई संपर्क जोडणी सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावत आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी विमान प्रवास प्रत्यक्षात साकार करत ‘उडे देश का आम नागरिक’ या संकल्पनेत योगदान देणे सुरु ठेवत आहे.