देशभरात सक्रिय असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांत ऐन उन्हाळ्यात पाऊस आणि गारपीट होत आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवानान खात्याने म्हंटले आहे. तसेच शनिवार 13 एप्रिलपर्यंत काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे.
देशभरात सक्रिय असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मध्यप्रदेशच्या 10 जिल्ह्यांमध्ये बुधवारी गारपीट झाली. तसेच राज्यातील नागपूरसह पूर्व विदर्भात बुधवारी मध्यरात्रीपासून चांगलाच पाऊस पडतो आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमध्येही हलका पाऊस पडत आहे. अवकाळी पावसाला कारणीभूत असलेले वेस्टर्न डिस्टर्बन्स इराण आणि पाकिस्तान मार्गे उत्तर भारतात पोहोचतात. त्यामुळे फेब्रुवारी, मार्च आणि आता एप्रिलमध्येही हवामानात सातत्याने बदल होत आहेत. शनिवार13 एप्रिलनंतर जम्मू-काश्मीर आणि हिमाचलच्या काही भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशात सातत्याने 5 दिवसांपासून पाऊस आणि गारपीट सुरू आहे. तसेच मध्यप्रदेशातील नर्मदापुरम आणि बैतुल जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलाय. उत्तर प्रदेशात हवामान झपाट्याने बदलणार आहे. हवामान खात्याने 13, 14 आणि 15 एप्रिल रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात 13 एप्रिल रोजी पावसासाठी रेड अलर्ट आहे. तर पूर्व उत्तर प्रदेशातही चांगला पाऊस होऊ शकतो. राज्यात धुळीच्या वादळासह 30 ते 40 कि.मी. ताशी वेगाने जोरदार वारे वाहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.