बार्शी – तालुक्यातील उपळे दुमाला येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित वखारिया विद्यालयात शुक्रवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र उपळे दुमाला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद खरात यांनी एच.पी.व्ही. लसीकरणबाबत मुलींना मार्गदर्शन केले.
प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद खरात यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांचा बुके व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे शैक्षणिक तत्त्वज्ञान हे पुस्तक देऊन मुख्याध्यापक यांनी सत्कार केला.
उपस्थित विद्यालयातील मुलींना मार्गदर्शन करताना डॉ.गोविंद खरात यांनी “स्त्री” ही नवनिर्मिती करणारी शक्ती असून स्त्रीचे आरोग्य अतिशय महत्त्वाचे आहे असे सांगत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करणारी एचपीव्ही लस अत्यंत प्रभावी व सुरक्षित असल्याचे सांगितले. ही लस ९ ते १४ वर्ष वयोगटातील मुलींना देणे सर्वात योग्य मानले जाते. तसेच ही लस मोफत दिली जाणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर, डॉ.गोविंद खरात, आरोग्य सहाय्यक शंकर काळे, सुनिता माने (आशा पर्यवेक्षक), आरोग्यसेवक वैभव धर्मे, आशावर्कर वनमाला सुरवसे आणि वैशाली शेंडगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्यसेवक
वैभव धर्मे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रोहिणी डोईफोडे (बुरगुटे) मॅडम यांनी केले.






















