सोलापूर : कोनापुरे चाळ येथील महापालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्रात तोडफोड केल्याची घटना घडली. दरम्यान, माहिती मिळताच आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी या केंद्राची पाहणी केली. पुढील कार्यवाहीच्यासूचना दिल्या. नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी येथे पाहणी करून आयुक्तांची भेट घेतली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध सदर बाजार पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, संबंधितांना समज देण्यात आली.
प्रभाग क्रमांक 15 मध्ये कोनापुरे चाळ येथे महापालिकेचे आरोग्यवर्धिनी केंद्र आहे. यापूर्वी या ठिकाणी येथील समाजासाठी समाज मंदिर होते. हे समाज मंदिर पूर्वत समाजाच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करण्याची मागणी एका गटाकडून होत होती. दरम्यान, या आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये काही अज्ञात व्यक्तींनी शटर उचकटून या आरोग्यवर्धिनी केंद्रातील काचा व इतर वस्तूंची तोडफोड केली. यामध्ये सुमारे 50 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. ही माहिती मिळताच महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी या केंद्रास भेट दिली. पाहणी केली आणि पुढील सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन ही माहिती दिली. दरम्यान, येथील नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनीही या केंद्राची पाहणी केली. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची भेट घेतली. चर्चा केली. सोलापूर महापालिका सभेत रीतसर ठराव करून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामुळे पूर्ववत या ठिकाणी हे केंद्र सुरूच राहावे अशी मागणी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी केली. यावेळी नियंत्रण अधिकारी तथा उपायुक्त आशिष लोकरे उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणी यापूर्वीच अज्ञात व्यक्तींविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा अशी घटना काल रात्री घडली. पदाधिकाऱ्यांनी याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर संबंधितांना समज देण्यात आली.
अज्ञात व्यक्तींकडून महापालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्राची तोडफोड झाली आहे. यामध्ये सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. काचा तसेच शटर याचे नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत येथील डॉ. पल्लोलू यांनी फिर्याद दिली. हे आरोग्यवर्धिनी केंद्र पूर्ववत सुरू राहणार आहे, अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी दिली.

























