सोलापूर – शहरातील बेगमपेठ पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या वहिवाट रस्त्यावर दुपारच्या सुमारास किरकोळ वादातून संतापाच्या भरात एका व्यक्तीने काठी उचलून रस्त्यावर उभ्या असलेल्या कारची तोडफोड केली. या तोडफोडीत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून वाद चिघळला आणि संतप्त झालेल्या संबंधित व्यक्तीने गाडीवर जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली. काठीने वारंवार प्रहार करत गाडीची काच आणि बॉडीचे नुकसान केले.
घटनेदरम्यान परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. संबंधित व्यक्तीविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

























