वसमत / हिंगोली – वसमत शहरासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभिमानाचा ठरला आहे. वसमत येथील होतकरू युवक अदनान ज्येष्ठ पत्रकार अमान उल्ला खान यांचे लहाने चिरंजीव अदनान उल्लाह खान यांनी ” लिंडसे विल्सन युनिव्हर्सिटी”, केंटकी स्टेट USA मधून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये मास्टर्स ची पदवी प्राप्त करत आंतरराष्ट्रीय स्तरावर वसमतचे नाव उज्वल केले आहे. अमेरिकेतील नामांकित लिंडसे विल्सन विद्यापीठात पार पडलेल्या भव्य आणि दिमाखदार दीक्षांत समारंभात अदनानला पदवी प्रदान करण्यात आली.
साध्या कुटुंबातून बाहेर पडत, अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अदनानने हे यश संपादन केले. शिक्षणासाठी परदेशात जाणे, तेथील स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहणे आणि अखेर पदवी प्राप्त करणे हा प्रवास सोपा नव्हता. मात्र कठोर मेहनत आणि स्पष्ट ध्येयामुळे अदनानने प्रत्येक अडथळ्यावर मात केली.
या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात सय्यद साद (मियाभाई) यांचे अदनानला लाभलेले अखंड पाठबळ, योग्य मार्गदर्शन आणि खरे बंधुत्व निर्णायक ठरले. प्रवेश प्रक्रियेपासून ते अभ्यास, मानसिक आधार आणि प्रेरणादायी मार्गदर्शन देत मियाभाईंनी अदनानच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याच्या यशात मोलाचा वाटा उचलला.

वसमतच्या मातीत घडलेला हा युवक आज अमेरिकेत पदवीधर होतो, ही बाब वसमतकरांसाठी गौरवाची आहे. अदनान उल्ला खानच्या या यशामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील तरुणांसाठी “स्वप्न मोठी असतील, तर जगाची सीमा अडथळा ठरत नाही” हा संदेश ठामपणे पुढे आला आहे.
अदनानच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या पुढील उच्च शिक्षण व आंतरराष्ट्रीय करिअरसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. वसमतचा हा लाल भविष्यात आणखी मोठी झेप घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


























