सोलापूर : ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर यांची यात्रा 2019 साली संपूर्ण शहरात जशी प्रकाशमय यात्रा साजरी झाली. तशीच यंदाची यात्रा देखील प्रकाशमय यात्रा करण्याचे आवाहन वीरशैव व्हिजनच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या यात्रेत देखील वीरशैव व्हिजनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उपक्रम नियोजनासाठी भुसार गल्ली येथील श्री मन्मथेश्वर मंदिर येथे बैठक घेण्यात आली. वीरशैव व्हिजनने 2019 साली शहरवासीयांना व सिद्धेश्वर भक्तांना प्रकाशमय यात्रा करण्याचे आवाहन केले होते. ती संकल्पना सोलापूरकरांनी स्वीकारली. संपूर्ण नंदीध्वज मार्ग आणि जवळपास 10 हजार भक्तांच्या घरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
आपण आपल्या घरात दिवाळी जशी साजरी करतो तशी श्री सिद्धरामांची यात्रा म्हणजे सोलापूरची दिवाळी आहे. श्री सिद्धरामांचा विवाह सोहळा म्हणजे आपल्या घरातलाच विवाह सोहळा असल्याप्रमाणे साजरा व्हावा अशी यामागची भूमिका व्हिजनची आहे.
बैठकीस वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, युवक आघाडी अध्यक्ष सोमनाथ चौधरी, विश्वस्त सोमेश्वर याबाजी, सचिव नागेश बडदाळ, कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी, युवक आघाडी कार्याध्यक्ष अविनाश हत्तरकी आदी उपस्थित होते.

























