अहिल्यानगर – प्रदुषणकारी डीजे ध्वनीक्षेपकाचा वापर टाळून विवाह समारंभात वारकरी संप्रदायाच्या पवित्र परंपरेचे दर्शन घडविण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.
शेवगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असलेले अशोक सखाराम राऊत यांची कन्या सौ अंजली आणि केडगाव येथील राजेंद्र गोपीनाथ घोडके यांचे चिरंजीव अमोल यांचा विवाह नुकताच पार पडला. या सोहळ्यात मुलीचे मामा कृष्णा मसुरे यांच्या समन्वयाने डीजे ध्वनिक्षेपकाऐवजी पर्यावरणपूरक आणि संस्कृती जतनाच्या हेतूने टाळ, मृदुंग, पखवाज, वीणा यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या सुरावटीत वधू–वर विवाहबद्ध झाल्याने उपस्थितांना वारकरी संप्रदाय संस्कृतीचे दर्शन घडले.
या पर्यावरणपुरक व आदर्श उपक्रमाची दखल घेऊन हरिभूमी प्रतिष्ठानच्या वतीने वधू–वर व दोन्ही कुटुंबीयांचा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या शुभहस्ते पर्यावरणमित्र सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
“विवाह समारंभात होणारे ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. इतरांनीही या पथदर्शी उपक्रमापासून प्रेरणा घ्यावी,” असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.
डीजेच्या कर्कश्य आवाजामुळे होणारे ध्वनीप्रदूषण मानवी शरीराला तसेच संपूर्ण सजीव सृष्टीला अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे विवाह समारंभामध्ये नागरिकांनी डीजे ऐवजी पारंपारिक वाद्यवृंदाचा वापर करून महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे कार्य करावे असे आवाहन हरिभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय ललवाणी यांनी केले.
यावेळी राजेंद्र घोडके, संगीता घोडके, अशोक राऊत, अरुणा राऊत, ऋषिकेश ललवाणी, संकेत घोडके, अभय राऊत आदी उपस्थित होते.
























