सोलापूर – शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या श्री ऐल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळेच्या वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर (स्वायत्त महाविद्यालय) यांच्या वतीने आयोजित आंतरविभागीय क्रीडा महोत्सव ‘स्ट्रोक २०२६’ विविध क्रीडाप्रकारांतील रोमांचक स्पर्धांनंतर उत्साहात पार पडला.
या क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभात विजेत्या तसेच उपविजेत्या संघांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. क्रीडाक्षेत्रातही विद्यार्थ्यांनी आपली दमदार व उल्लेखनीय कामगिरी सादर केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, शारीरिक व मानसिक विकासाला चालना देणारा हा उपक्रम सर्वांगीण विकासाचा एक आदर्श नमुना ठरला आहे.
विविध क्रीडाप्रकारांतील सातत्यपूर्ण व उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मुलांच्या सामान्य अजिंक्यपदावर संगणक विज्ञान व अभियांत्रिकी (CSE) विभागाने ५५ गुणांसह वर्चस्व सिद्ध केले. सिव्हिल विभाग ३५ गुणांसह उपविजेता, तर आयटी विभागाने ३५ गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. क्रिकेट, व्हॉलीबॉल, टेबल-टेनिस, बास्केटबॉल, फुटबॉल आणि बुद्धिबळ या सर्व खेळांत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली.
या क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, विश्वस्त भूषण शहा, वैभव गांधी व पराग शहा यांच्या शुभेच्छांसह प्राचार्य डॉ. विजय आठवले, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
बुद्धिबळ, टेबल-टेनिसमध्ये मेंदूचा कस
बुद्धिबळ (मुले) स्पर्धेत आयटी विभागाने विजेतेपद पटकावले, तर सीएसई विभाग उपविजेता ठरला. वैयक्तिक गटात रोशन दगडे (मेकॅनिकल) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. बुद्धिबळ (मुली) स्पर्धेत एफवाय सॉफ्ट विभाग विजेता, तर सीएसई उपविजेता ठरला. रेनी पलसापुरे (सीएसई) हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळवला.
टेबल-टेनिस (मुले व मुली) या दोन्ही गटांत सीएसई विभागाने वर्चस्व राखले. अंतिम सामन्यातील सर्वात मौल्यवान खेळाडू म्हणून अमेय फुलंबरकर व डिंपल कोंडेकर, तर मालिकावीर म्हणून यश पाटील व प्रियल त्यारल यांचा गौरव करण्यात आला.
मैदानी खेळांत चुरशीची लढत
फुटबॉल (मुले) स्पर्धेत सीएसई विभागाच्या अंकुर चौगुले याला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. बास्केटबॉल (मुले) स्पर्धेत एफवाय कोर विभाग विजेता, तर (मुली) गटात सीएसई विभाग विजेता ठरला. व्हॉलीबॉल (मुले व मुली) या दोन्ही गटांतही सीएसई विभागाचे वर्चस्व दिसून आले.
क्रिकेटमध्ये सिव्हिल व एफवाय सॉफ्टची चमक
क्रिकेट (मुले) स्पर्धेत सिव्हिल विभाग विजेता, तर ईएनटीसी उपविजेता ठरला. आविष्कार तीर्थकर याने मालिकावीरचा मान मिळवला. क्रिकेट (मुली) स्पर्धेत एफवाय सॉफ्ट विभाग विजेता, तर सिव्हिल उपविजेता ठरला. प्राची जगताप हिने उत्कृष्ट कामगिरी करत सामनावीर व सर्वाधिक षटकारांचा सन्मान पटकावला.
‘स्ट्रोक २०२६’ या क्रीडा महोत्सवाने केवळ स्पर्धात्मकता नव्हे, तर मैत्री, शिस्त, संघभावना आणि सकारात्मक ऊर्जेचा संदेश देत विद्यार्थ्यांच्या आठवणींमध्ये कायमचे स्थान निर्माण केले, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.























