केरळच्या कोझिकोड, त्रिशूर आणि मलप्पुरममध्ये वेस्ट नाईल तापाची 6 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर त्रिशूरमध्ये या तापामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आलीय. त्यामुळे केरळच्या आरोग्य विभागाने राज्यात वेस्ट नाईल तापाबाबत अलर्ट जारी केला आहे.
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, हा आजार मच्छर चावल्याने होतो. तापासोबतच उलट्या, जुलाब आणि डोकेदुखीच्या तक्रारी आहेत. वेस्ट नाईल तापाच्या 10 पैकी 6 प्रकरणांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने रुग्णांची कोणतीही अधिकृत आकडेवारी शेअर केलेली नाही. मात्र, सर्व जिल्ह्यांच्या मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेसह देखरेख ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, सर्व जिल्हे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना नियमित स्वच्छता करण्याच्या आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यापूर्वी 2011 मध्येही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वेस्ट नाईल तापाचे रुग्ण आढळून आले होते.
वेस्ट नाईल ताप हा सामान्यतः पक्ष्यांमध्ये पसरणारा रोग आहे. हा आजार या पक्ष्यांकडून मच्छरांत पसरतो, या मच्छरांच्या चाव्याव्दारे हा आजार माणसापर्यंत पोहोचतो. तथापि, वेस्ट नाईल ज्वर व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरणे अत्यंत दुर्मिळ आहे.
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, वेस्ट नाईल तापाने ग्रस्त 10 पैकी 8 लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. इतर लोकांमध्ये ताप, उलट्या, जुलाब आणि डोकेदुखी, स्नायू दुखणे, चक्कर येणे, स्मरणशक्ती कमजोर होणे अशी लक्षणे दिसतात.काही प्रकरणांमध्ये, वेस्ट नाईल तापामुळे मेंदूतील जळजळ आणि मेनिंजायटीस यांसारख्या न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात, म्हणजे पाठीच्या कण्यातील जळजळ, ज्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.