राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर यंदा मोठं संकट उभं राहिलं आहे. गतवर्षीच्या तुलनेत चांगला दर मिळेल म्हणून कापूस आणि सोयाबीन साठवलं पण दरवाढीची शक्यता दिसत नाही अशी स्थिती आहे.
यंदाच्याहंगामात कापूस अन् सोयाबीन उत्पादन एकरी चार-पाच क्विंटल मिळाले आहे. मात्र, भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस तसेच अजूनही सोयाबीन घरात साठवून ठेवलं आहे. परंतु, सोयाबीनसह कापसाचे भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतमाल किती दिवस घरात ठेवायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या हंगामात कपाशीचा पेरा वाढला होता. मागील वर्षात जानेवारी महिन्यात कापसाला ८ हजार ५०० रुपये क्विंटल भाव मिळाला होता. दरम्यान या तुलनेत कापसाची आवक कमी असून सुद्धा कापसाच्या भावात क्विंटल मागे १ हजार ३०० रुपयांच्या सुमारास घसरण झाली आहे.
सद्यस्थितीत विदर्भातील कापसाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज गुरुवारी (१८ जानेवारी) किमान भाव ६ हजार ७०० पासून कमाल भाव ७ हजार ३३५ रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे आहे. तर, अकोला कृषी बाजारात कापसाला ६ हजार ७८० ते ७ हजार २०० रुपयांनी कापूस घेतला जात आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून शेतमाल घरातच साठवून ठेवणे पसंत केला आहे. आज गुरूवार रोजी अकोला बाजारात १ हजार ४५१ क्विंटल कापूस खरेदी झाला असून या तुलनेत अकोटच्या बाजारात आवक जास्त होती. सुमारे ४ हजार इतका क्विंटल कापूस खरेदी झाला आहे.
अकोल्याच्या बाजारात १४ डिंसेबर २०२३ रोजी कापसाला ५ हजार पासून ७ हजार ५५० रूपये असा भाव होता. त्यानंतर कापसाच्या दरात चढ-उतार कायम राहिले. दरम्यान २०२४ च्या पहिल्यांच् दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी कापसाला कमीत कमी ६ हजार ८८० ते जास्तीत जास्त ७ हजार ३०१ तर सरासरी भाव ७ हजार इतका होता. परंतु, इथून पुढे कापसाच्या दरात घसरण पाहायला मिळाली असून १५ डिंसेबर रोजी ६ हजार ९०० ते ७ हजार रूपयांपर्यत प्रतिक्विंटल कापसाला भाव मिळाला. सद्यस्थित रोजी अकोला बाजारात गेल्या चार दिवसांपासून कापसाचे दर स्थिरावले असून दर स्थिर आहे. ६ हजार ७८० ते ७ हजार २०० रुपयांवर कापसाला भाव भेटत आहे.
२०२३ च्या डिसेंबरच्या अखेरीस ४ हजार ७०० हजाराच्या पुढे असलेला सोयाबीनचा दर पुन्हा खाली आला आहे. या २०२४ च्या जानेवारीतील पहिल्याच दिवशी सोयाबीन हा भाव कायम होता, १ जानेवारी रोजी सोयाबीनला साधारणपणे ४ हजार २७० पासून ४ हजार ७३५ रूपये इतका क्विंटलमागे भाव मिळाला. इथून पुढ सोयाबीन दरात घसरणीचं चित्र पाहायला मिळाले. ३ जानेवारीला रोजी पासून मिळाला ४ हजार ६७० रूपये भाव काही दिवस स्थिर राहला. त्यानंतर आज गुरुवार रोजी सोयाबीन दरात घसरण झाली असून ४ हजार २०० पासून ४ हजार ५८० असा सोयाबीनला भाव मिळाला आहे. आज शेतकरी गरजेपोटी नाईलाजाने मिळेल त्या भावात कापूस आणि सोयाबीन विक्री करत आहे. अकोल्याच्या बाजारात ४ हजार ३५० एवढं क्विंटल सोयाबीन खरेदी झालंय.
शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर
या हंगामात कापसाचा पेरा वाढवलाय. त्यामुळे कापूस वेचणीला मजूरही मिळत नव्हते. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या कापसाची मोठी नासाडी झाली आणि त्यात कापूस भाव दिवसेंदिवस कमी होत असून पिकाला लावलेला खर्च निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये कापसाची खरेदी सुरू आहे. आधीच कपाशीचे उत्पादन कमी झाले अन् त्यातच सतत कपाशीचा भाव कमी होत असल्याने शेतकऱ्यांनी कपाशीचा पेरा करावा की नाही, असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे.