पंढरपूर – येथील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरातील विठ्ठलरुक्मिणी स्वयंवराच्या संदर्भातील मंदिरात लावलेली छायाचित्रेच मंदिर समितीने काढून ठेवली आहेत की गायब केली आहेत अशी शंका सर्वसामान्य भाविकांमधून व्यक्त केली जात आहे. या संदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी देखील एका निवेदनाव्दारे मंदिरातील हा एक ऐतिहासिक व पुरातन अनमोल ठेवाच मंदिर समितीने गायब केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या संपुर्ण प्रकाराची सविस्तर माहिती अशी की, येथील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरामधील श्रीरूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासमोरच असलेल्या रूक्मिणी सभामंडपात श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या स्वयंवराची सचित्र माहिती दर्शविणारी विविध प्रसंगांची तैलचित्रे लावलेली होती, मात्रं सध्या पाहिले तर याठिकाणची वर्षानुवर्षे लावलेली ही तैलचित्रेच गायब आहेत. प्रसिद्ध पुरातन चित्रकार राजा रवी वर्मा यांनी ही चित्रं रेखाटली होती व कल्याण शेटे या जुन्या कलाकाराने या चित्रांमध्ये रंग भरले होते. शेकडो वर्षांपासून ही चित्रं फ्रेम करून मंदिरातील रुक्मिणी सभामंडपाच्या ठिकाणी लावलेली होती. ही चित्रं वारकरी भाविकांसाठी विशेष पर्वणी होती. जी पाहताना रुक्मिणी स्वयंवराचं जिवंत दृश्यच डोळ्यासमोर उभं झाल्याचा साक्षात्कार व्हायचा. पण आज ती चित्रं याठिकाणी नाहीत. मंदिर समितीच्या कारभा-यांनी ही सगळी चित्रं कुठं अडगळीत फेकून दिली की कुणाला विकून टाकली ? असे प्रश्न आता यामुळे सर्वसामान्य भाविक – भक्तांमधून उपस्थित केले जात आहेत.
———————–
अनेक तर्कवितर्काला उधाण
दरम्यान दरवर्षी श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा मोठा गाजावाजा करत उत्साहाने साजरा करणा-या मंदिर समितीने श्री कृष्ण- रुक्मिणी स्वंयवराची शतकानूशतके मंदिरात लावलेली मौल्यवान, दुर्मिळ छायाचित्रंच काढल्याने भाविक भक्तांमधून संताप व्यक्त होत असुन या चित्रांचं मंदिर समितीनं काय केलं असेल? यासंदर्भात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
——————-
भाविक भक्तांमधून मागणी
दरम्यान मंदिर समितीने नेमकं या चित्रांचं केले काय ? ही चित्रं तेथून का काढली? मुळ मौल्यवान तैलचित्रे काढून त्याच्या ठिकाणी डिजीटल प्रती आता लावल्यात त्या सुध्दा अनेक ठिकाणी फाटलेल्या आहेत, हे कशासाठी? मुळ ओरिजनल चित्रांचं काय केलं? याचा खुलासा व कारण मंदिर समितीचे प्रशासकीय अधिकारी व सदस्यांनी तसेच सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी तातडीने जाहीर करणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्य भाविकांमधून बोलले जात आहे.
————————-
विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या रुक्मिणी सभामंडपातील स्वयंवराच्या दुर्मिळ चित्रां बरोबरच विठ्ठल मंदिरात असलेले पुरातन छत्रपती शिवरायांचे व भक्त पुंडलिक, संत नामदेव यांचेसह अनेक संतांचे पुरातन मौल्यवान चित्रे देखील दिसत नाहीत ती सुध्दा गायब आहेत. या सर्व मौलीक, पुरातन ऐतिहासिक ठेवा असलेल्या तैलचित्रांच्या संदर्भात नेमकं काय घडलं ? याचा खुलासा मंदिर समितीनं तातडीनं करावा अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल.
गणेश अकुंशराव ( सामाजिक कार्यकर्ते, पंढरपूर )

























