सांगोला – सत्ता किंवा पदाच्या मागे मी लागणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत पद असो किंवा नसो सांगोला तालुक्यातील जनतेची सेवा करत राहणार असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकाप सोबत आघाडी करून लढवणार असल्याचे प्रतिपादन माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले. ते मंगळवार दि.१६ डिसेंबर रोजी सांगोला येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी जि.प.अध्यक्षा जयमाला गायकवाड, तानाजी पाटील, मधुकर बनसोडे, विजय येलपले, शिवाजी बनकर, डॉ.पियुष साळुंखे, ॲड.यशराजे साळुंखे, अनिल खटकाळे, अनिल खडतरे, सोमनाथ लोखंडे, चंदन होनराव, शिवाजी कोळेकर, राज मिसाळ, विश्वनाथ चव्हाण, विजय पवार, चंद्रकांत चौगुले, योगेश खटकळे, सखुबाई वाघमारे, ॲड.चैत्रजा बनकर, पूजा पाटील, सुनीता खडतरे उपस्थित होते.
पुढे बोलताना दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, सांगोला तालुक्यातील साळुंखे पाटील परिवारावर प्रेम आणि विश्वास असणारे तमाम नागरिक म्हणजे आमचे कुटुंब आहे. ३५ वर्षे मी जनतेच्या प्रेम आणि विश्वासावर राजकीय जीवनात काम करत आहे. युती किंवा आघाडीसाठी मी कधीच कुणाच्या दारात गेलो नाही, त्यामुळे कुणी मला वगळून युती आणि आघाडी करण्याची भाषा करत असेल तर त्यांचा राजकीय पुनर्जन्म माझ्यामुळे झाला आहे हे त्यांनी विसरू नये असा इशारा त्यांनी माजी आ.शहाजीबापू पाटील यांना दिला. याप्रसंगी सांगोला शहरासह तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर या मेळाव्यातून ते याबाबत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर बोलताना लवकरच कार्यकर्त्यांच्या मनात जे आहे त्याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करून तसाच निर्णय घेऊ असे सूचक विधान करून भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत.



























