कोलंबो, २० जुलै (हिं.स.) : महिला आशिया चषक २०२४ च्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हींतही चमकदार कामगिरी केली.
श्रीलंकेतील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणारा पाकिस्तानचा संघ अवघ्या १०८ धावांवर गारद झाला. पाकिस्तान संघाला पूर्ण २० षटकेही फलंदाजी करताना आली नाही. १९.२ षटकांत पाकिस्तानचा संपूर्ण संघ तंबूत परतला.
त्यानंतर १०९ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या भारतीय संघाने केवळ १४.१ षटकांत पूर्ण केले. भारताकडून स्मृती मंधानाने ३१ चेंडूत ४५ धावा केल्या. यात ९ चौकारांचा समावेश आहे. त्याच्याशिवाय शेफाली शर्माने २९ चेंडूत ४० धावांची खेळी केली. दोघींनी केवळ ९.३ षटकांत ८५ धावांची भागीदारी करत विजयश्री खेचून आणण्यात मोठा वाटा उचलला. दरम्यान भारताचे लागोपाठ तीन गडी बाद झाले. कर्णधार हरमनप्रीत कौर (५) आणि जेमिमाह रॉड्रिग्ज (३) नाबाद राहिले.
पाकिस्तानला १०८ धावांवर रोखण्यात दीप्ती शर्माचे महत्त्वाचे योगदान होते. दीप्तीने ४ षटकांत २० धावा देत सर्वाधिक ३ बळी घेतले. दीप्तीने निदा डार, तुबा हसन आणि नाशरा संधूला बाद केले. याशिवाय रेणुका सिंगने ४ षटकांत १४ धावांत २ बळी, पूजा वस्त्राकरने ४ षटकांत ३१ धावांत २ बळी, तर श्रेयंका पाटीलने ३.२ षटकांत १४ धावांत २ गडी बाद केले.
दुसरीकडे पाकिस्तानकडून गुल फिरोजा आणि मुनिबा अली सलामीला आले. मुनिबाला ११ धावांवर पूजाने तंबूत पाठवले. तर फिरोजा वैयक्तिक ५ धावांवर बाद झाली. अमीन हिने २५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण त्यासाठी ३५ चेंडू घालवले. अमीनला रेणुकाने बाद केले. आलिया ६ धावा करून बाद झाली.