मंगळवेढा – भाळवणी (ता. मंगळवेढा) येथील शेतकरी महिला तायडा महादेव चौगुले विद्या गोरख गेजगे तसेच शेतकरी महादेव जबरदस्त चौगुले यांनी शेजारील प्रोजल सौर ऊर्जा कंपनीमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक व शेतीचे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. कंपनीने बेकायदेशीररीत्या काम करत त्यांच्या शेतीवर अतिक्रमण, पिकांचे नुकसान व नैसर्गिक जलप्रवाहात बदल केल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. या कंपनीवर कारवाई करून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मंगळवेढा येथील प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने काम सुरू करताना सरकारी सर्वे मोजणी न करता जमीन सपाटीकरण केले. यावेळी संबंधित क्षेत्र आपले असल्याचे वारंवार सांगूनही कंपनीने अंदाजे दोन एकर शेतीतील बांध, झाडे व झुडपे नष्ट करून त्या जमिनीवर रोटावेटर फिरवला. नंतर सरकारी मोजणी झाल्यावर सदर क्षेत्र हे महादेव चौगुले यांचेच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कंपनीने कंपाउंड टाकले असले तरी आधी नष्ट केलेल्या शेतीबाबत योग्य तो न्याय दिला नसल्याचा आरोप आहे.
तसेच कंपनीने कंपाउंड भिंत अवघ्या अर्धा ते एक फूट अंतरावर उभारल्याने त्याची सावली शेतातील पिकांवर पडून उत्पादनात घट होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सुमारे ३८५० फूट लांबीचा हा कंपाउंड शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे.
कंपनीने सपाटीकरण करताना जलशिवार योजनेअंतर्गत झालेली कामे, बांध, नाले तसेच मोठी झाडे नष्ट केली. नैसर्गिक जलप्रवाह बदलून सर्व पाणी शेतकऱ्यांच्या शेतात सोडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महादेव चौगुले यांच्या चार एकर क्षेत्रातील मका पिकाचे पाण्यामुळे नुकसान झाले असून त्यासाठी त्यांनी सुमारे १ लाख १० हजार रुपयांचा खर्च केल्याचे सांगितले आहे. सुरुवातीला कंपनीने नुकसानभरपाई देण्याचे कबूल केले होते, मात्र आता नकार दिला जात असल्याचा आरोप आहे.
शेजारील शेतकरी विद्या गेजगे यांच्या शेतातही कंपनीकडून आलेल्या पाण्यामुळे पिके पूर्णपणे पाण्यात गेली असून आजतागायत वापसा न आल्याने खरीप व रब्बी हंगामातील पिके घेता आलेली नाहीत.
या प्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून कंपनीकडे पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने, संबंधित सौर ऊर्जा कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली तसेच दिनांक २२ पासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पण प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही झाली नसल्यामुळे शेतकरी महादेव चौगुले व महिला शेतकरी तायडा महादेव चौगुले विद्या गोरख गेजगे यांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास कंपनी जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही
भाळवणी तालुका मंगळवेढा येथील प्रोजल या सौरऊर्जा कंपनीमुळे आमचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय आमच्या शेतीचे झालेले नुकसान पाहून आम्हाला मानसिक ताणतणाव देखील खूप मोठा झाला आहे. ही सर्व परिस्थिती डोळ्यांनी पाहत घरी बसण्यापेक्षा आम्ही प्रांत कार्यालयासमोर आमचा प्राण त्यागू. पण आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही.
शेतकरी महिला तायडा चौगुले, विद्या गेजगे व इतर






















