पंढरपूर – पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान । आणिक दर्शन विठोबाचे ।। जन्मोजन्मांतरी हेचि घडो मज । मागणे श्रीहरि नाही दुजे ।। या भावनेने विठुरायाच्या दर्शनासाठी, पवित्र चंद्रभागेच्या स्नानाची पर्वणी लुटण्यासाठी भाविक येथे लाखोंच्या संख्येने येत असतात.
येथील चंद्रभागेच्या पात्रात अगोदरच सर्वत्र घाणीचे साम्राज्य असताना त्या मध्ये आणखीन भर पडते ती दशक्रिया विधी नंतरचे आवास्तव पडलेले केस, पिंडदानासाठींचे भाताचे गोळे, चिंध्यांचे ढिगार्यांची. या मध्येच सर्वात कहर म्हणून दशक्रिया विधीचा भाग असलेले मुंडन केल्या नंतर वाळवंटात टाकून दिलेल्या ब्लेड किंवा रेजची पाने तसेच या पानांच्या अर्ध्यां तुकड्यांमुळे अनवाणी प्रदक्षिणा पुर्ण करणाऱ्या भाविकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.
येथील चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटा मध्ये सगळीकडे चिंध्याचे ढिग, निर्माल्य, भग्न अवस्थेमधील देवदेवतांच्या मुर्ती, नारळाच्या शेंड्या, कुजलेल्या अवस्थेमधील अन्नांचे ढिग, द्रोणपत्रावळींचे पडलेले ढिग, भाविकांनी पहाटेच्या वेळी उरकलेले प्रातविधीचे कार्यक्रम यामुळे प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येते.
——————————–
मृतांच्या नातेवाईकांची दररोज असते मांदियाळी
या मध्येच पवित्र वाळवंटा मध्ये दशक्रिया विधी करण्यासाठी मृतांच्या नातवाईक मंडळींची दररोज मोठी मांदियाळी होत असते. पांडुरंगाच्या येथील वास्तव्यामुळे पंढरपूर ही अध्यात्मिक नगरी किंवा देवभूमी म्हणून देखील प्रसिध्द आहे.त्यामुळेच फक्त सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्याच्या विविध भागातून तसेच परराज्यातून देखील मृतांच्या नातेवाईक मंडळींची येथीलव वाळवंटा मध्ये दररोज मोठी वर्दळ असते.
——————————
दशक्रिया विधी पात्रातील सुनियोजित जागेवर करावेत
वाळवंटातील पुंडलिक मंदिरा जवळ हे सर्व कार्यक्रम अगदी बिनदिक्कतपणे चाललेले असतात. त्यामध्ये पिंडदान, मयतांच्या नातेवाईक मंडळींचे मुंडण करणे अशा प्रकारच्या कार्यक्रमांची उघड्यावरच रेलचेल असते. त्यामुळे असे विधी चंद्रभागा नदीच्या एखाद्या सुनियोजित भागात केले जावेत. या बरोबरच नदीच्या पात्रात सर्रास म्हशी, गायी आदी जनावरे धुणे, भाविक किंवा शहरातील नागरिक आपली दुचाकी, चारचाकी गाड्यांची देखील नदीच्या पात्रात स्वच्छता करीत असतात.
——————————-
चंद्रभागेचे नंदनवन होणार तरी कधी
एकीकडे आपल्या जवळ असलेल्या सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा नदीच्या काठावरील प्रितिसंगमाचे यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळाचे तर दुसरीकडे देशातील कन्याकुमारी येथील अथांग पसरलेल्या समुद्राच्या संगमावरील विवेकानंदांच्या स्मारकाचे उदाहरण दिसत आहे. मात्र ही दोन्ही उदाहरणे डोळ्या समोर असताना महाराष्ट्राची दक्षिणकाशी आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री विठुरायाची भुवैकुंठ नगरी समजल्या जाणाऱ्या चंद्रभागेच्या वाळवंटाचे आपण नंदनवन करु शकत नाही ही बाब अतिशय खेदाची आहे.
—————————
नमामी चंद्रभागा अभियानाचा उडाला बोजवारा
नमामी गंगेच्या धर्तीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमामी चंद्रभागा अभियानाची घोषणा केली. या योजनेसाठी काही कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करुन अगदी उगमा पासून ते राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे कर्नाटक राज्यापर्यंत वाहणाऱ्या चंद्रभागेचा विकास करण्याचे उद्दिष्ठ डोळ्या समोर ठवलेले होते. मात्र देवेंद्र फडणवीस आता पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत तरीही या योजनेला अद्यापही गती मिळाली नाही.

















