कुरूल – मोहोळ तालुक्यातील मौजे कुरुल येथे महिला व बालकल्याण विभागांतर्गत मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत दि. २ मार्च ते ८ मार्च या कालावधीत जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय योगदानाची दखल घेऊन त्यांना सन्मान, समानता व सक्षमीकरण देण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या सप्ताहात गरोदर मातांची ओटी भरण, अन्नप्राशन कार्यक्रम, वृक्षारोपण, सुदृढ बालक स्पर्धा, सुदृढ पालक स्पर्धा, बाल संरक्षण समिती सभा तसेच ताट-वाटी चाचणी असे उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमांमुळे माता-बाल आरोग्याबाबत जनजागृती झाली तसेच कुटुंबव्यवस्थेत महिलांचे महत्त्व अधोरेखित झाले.
या कार्यक्रमाला सुवर्णा जाधव मॅडम, कुरुलच्या सरपंच शिलादेवी माने, ग्रामपंचायतीच्या सर्व महिला सदस्य, ग्रामसेवक श्रीराम खरात, क्लर्क संतोष जाधव तसेच बाल संरक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सुदृढ बालक स्पर्धेतील विजेत्या बालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बिट सुपरवायझर कल्पना झंपले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुल येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जयश्री अंकुशराव यांनी केले. तसेच या उपक्रमासाठी ग्रामपंचायत कुरुलचे सहकार्य लाभले.
महिला सक्षमीकरण सप्ताहामुळे गावात महिलांच्या आरोग्य, पोषण व हक्कांविषयी जागरूकता निर्माण झाली असून “सशक्त महिला – सशक्त समाज” हा संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.
























