मुंबई, ३ ऑगस्ट (हिं.स.) : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप करत दावा केला आहे की, देशमुख यांच्याकडे पैसे त्यांच्या पीए मार्फत पोहोचायचे आणि याचे पुरावे सीबीआयकडे आहेत. वाझेने म्हटले आहे की, त्याने याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सर्व पुरावे सादर केले आहेत.
वाझे सध्या तळोजा कारागृहात असून, वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात आणण्यात आले असता त्याने माध्यमांशी संवाद साधला. याशिवाय, वाझेने शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावरही आरोप केले असून, नार्को चाचणीसाठी त्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. या आरोपांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीत नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
या घटनेचा संदर्भ असा आहे की, अलीकडेच अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते, त्याला फडणवीस यांनी उत्तर दिले होते. आता वाझेने केलेल्या ह्या नवीन आरोपामुळे वादाला तोंड फुटणार आहे.